![]()
पुलगाव येथील सीएडी कॅम्प परिसरात संरक्षक जाळीत बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जाळीत अडकलेल्या बिबट्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या समन्वयातून अत्यंत सावधगिरीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. उपवनसंरक्षक हरविर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. पीपल्स फॉर ॲनिमल्स, वर्धा आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या बचावकार्य केले. बिबट्याला सुरक्षितपणे नियंत्रित केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करण्यात आली. त्याची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. या कारवाईत सीएडी कॅम्पचे आयएसओ कॅप्टन चिराग, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित झा, पीपल फॉर ॲनिमलचे आशिष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे, डॉ. अक्षय गिरी यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, क्षेत्र सहाय्यक व्ही. एम. नरांजे, वनरक्षक के. डी. राठोड, माधव माने, अरुण गीते, पारस बडदे, वैशाली खोंडे आणि पूजा पूयेड यांनी सक्रिय सहभाग घेतला. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत असून, विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे बिबट्याचे प्राण वाचविण्यात यश आले.
Source link
जाळीत अडकलेल्या बिबट्याची थरारक सुटका:रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा