![]()
कराड शहर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस अंमलदार या कायद्याच्या रक्षकांनीच तीन अल्पवयीन मुलांसोबत घृणास्पद प्रकार केल्याची घटना कराड शहर पोलिस ठाण्यात घडली आहे. तीन मुलांना नग्न व्हायला लावून एकमेकांना गुप्तांगावर मारहाण करण्यास सांगितले. त्या प्रकाराचे मोबाईलवर चित्रिकरण केल्याचा घृणास्पद प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक आणि बालकल्याण समितीकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाईची न झाल्यास पीडित मुलासह त्याच्या कुटुंबाने आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात पीडित मुलगा आणि त्याच्या कुटुंबाने घडलेल्या घटनेचा सविस्तर तपशील दिला आहे. कराडच्या विद्यानगर परिसरातील एका कॉलेजच्या आवारात तरूणांच्यात किरकोळ मारामारी झाली होती. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून तो मुलगा घरी गेला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याला कराड शहर पोलिस ठाण्यातून फोन करून बोलावून घेण्यात आले. संबंधित मुलगा कुटूंबियांसह पोलिस ठाण्यात गेला असता मारामारीच्या घटनेतील आणखी दोघे त्याठिकाणी उपस्थित होते. एका अधिकारी व कर्मचार्याने त्या अल्पवयीन मुलाला शिविगाळ केली. खोलीचा दरवाजा बंद करून त्या मुलासह अन्य दोघांना कपडे काढण्यास सांगितले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्याने तिन्ही मुलांना नग्न करून त्यांना मोबाईलवर अश्लिल चित्रफिती दाखवल्या. तसेच एकमेेकांना गुप्तांगावर मारहाण करण्यास सांगितले. त्या प्रकाराचे त्यांनी मोबाईलवर चित्रिकरण केले. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलांकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तिघांना सोडून दिले, अशी तक्रार एका पीडित मुलासह त्याच्या कुटुंबाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, बालकल्याण समितीकडे केली आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही दिला आहे. सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या भानगडी थांबायचं नावच घेईनात. काही दिवसांपूर्वी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलिसांनी गुटख्याची कारवाई दडपण्यासाठी ८ लाख रुपयांची तोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. त्या प्रकरणाची गोपनीय माहिती मिळताच सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तातडीने चौकशीचे आदेश देऊन संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची फलटणला बदली केली होती. कराडमधील ताज्या घटनेत पीडित मुलाने आरोप केलेल्या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबद्दल बरंच काही बोललं जात आहे. बरीच वर्षे संबंधित अधिकारी कराड तालुक्यातच आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे काय कारवाई करतात, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यात १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत घडलेल्या गंभीर घटनेमुळे सातारा जिल्हा पोलिस दलाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील या रजेवर आहेत. त्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
Source link
विवस्त्र करून अल्पवयीन मुलांचं चित्रिकरण:कराड शहर पोलिस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; अधिकारी, कर्मचाऱ्याविरोधात पीडिताची तक्रार