Headlines

‘सिंहस्थ संस्कृती’ प्रदर्शनाचा समारोप:दुर्मीळ छायाचित्रांतून उलगडला नाशिकच्या सिंहस्थ परंपरेचा इतिहास; PHOTOS




नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी जपणाऱ्या ‘सिंहस्थ संस्कृती’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नासिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुनंदा म. गोसावी आर्ट गॅलरी, गुरुदक्षिणा हॉल येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनातून नाशिकच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले. सन 1932 पासूनच्या विविध सिंहस्थ कुंभमेळ्यांशी संबंधित दुर्मीळ, अप्रकाशित आणि ऐतिहासिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर्सनी जतन केलेल्या या छायाचित्रांतून जुन्या नाशिकचे रूप, गोदावरीचे घाट, साधू-संतांचे आखाडे, शाही स्नान, भाविकांची गर्दी, धार्मिक विधी आणि तत्कालीन सामाजिक जीवनाचे चित्र उभे राहिले. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग, अतिरिक्त आयुक्त कलाकार रणदिवे, सचिव शरद घोरपडे, पोलिस उपायुक्त किशोर काळे, योगेश कमोद, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिकचे कार्यवाहक सुहास वैद्य यांचा समावेश होता. कुंभ प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सर्व सहभागी छायाचित्रकारांचा रोटरी क्लब ऑफ नासिक नाईन हिल्स च्या वतीने शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हे कलेक्शन अत्यंत उपयुक्त असून नियोजनामध्ये याचा आम्हाला प्रचंड उपयोग होईल असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. इतिहास अभ्यासक, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, अभियंता, सनदी लेखापाल, शिख संप्रदायाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी आणि तरुणांनी प्रदर्शनाला प्रतिसाद दिला. जुन्या छायाचित्रांतून ज्येष्ठ नागरिकांना नाशिक आणि पूर्वीच्या सिंहस्थाच्या आठवणींना उजाळा मिळाला, तर विद्यार्थ्यांना सिंहस्थ परंपरेचा इतिहास समजून घेण्याची संधी मिळाली. काळानुसार बदललेल्या सिंहस्थाचे चित्रण हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले. जुन्या काळातील सुविधा, पारंपरिक आखाडे, भाविकांची वाढती संख्या, बदलते घाट आणि रस्ते तसेच कुंभमेळ्याच्या आयोजनातील बदल छायाचित्रांतून दिसून आले. त्यामुळे हे प्रदर्शन नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी परिवर्तनाचे दस्तऐवजीकरण ठरेल असे गौरवोद्गार यावेळेस अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सचे मुख्य समन्वयक धनंजय बेळे म्हणाले, “नाशिकच्या सिंहस्थाची समृद्ध परंपरा आणि ऐतिहासिक वारसा दुर्मीळ छायाचित्रांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि व्यक्त केलेले कौतुक पाहता या उपक्रमाचे सार्थक झाले असून, भविष्यातही असे सांस्कृतिक वारसा जपणारे उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली आहे.” प्रदर्शन सांगता समारंभ प्रसंगी रोटरी क्लब ऑफ नासिक नाईन हिल्सचे अध्यक्ष अभय नेरकर सचिव हर्षद बेळे प्रकल्प संचालक अजय चव्हाण माजी अध्यक्ष कैलास सोनवणे जेष्ठ रोटेरियन जयंत गोसावी खजिनदार धीरेंद्र वाघ विराज गडकरी, रोट्रॅक्टर पार्थ ठोंबरे, ओम महाजन, मयुरेश शिंदे, हिमांशू पाटील, अथर्व घायाळ, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *