![]()
‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’ या येवला पैठणीच्या अग्रगण्य ब्रँडच्या पुण्यातील भव्य दालनाचे उद्घाटन नुकतेच झाले. संसदीय समितीच्या अध्यक्षा व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते भांडारकर रस्त्यावर हे दालन सुरू करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि भारतीय हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कापड प्रसिद्ध आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय हातमाग दिन, ‘एमएसएमई’ योजना, कारागिरांसाठी कर्जसुविधा आणि पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. साडी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असून, साड्या विणणे ही एक कला आहे. या कलेला प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. पुण्यातील महिला चोखंदळ असून, त्यांना साड्यांची चांगली पारख आहे. ठाण्यानंतर ‘निरुपाज्’ने आता पुण्यात मध्यवर्ती भागात हे दालन सुरू केले आहे. ‘निरुपाज्’च्या साड्या स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देऊन तयार करण्यात आल्या आहेत, ही कौतुकाची बाब आहे, असे प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. येत्या काळात रेल्वेस्थानकांवर वस्त्रदालने आणि स्थानिक हस्तकला उत्पादनांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पारंपरिक कला आणि व्यवसायांचे जतन होऊन ते पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या उद्घाटनप्रसंगी ‘निरुपाज्’च्या संस्थापिका निरुपा तायडे, त्यांच्या मातोश्री वंदना वझारे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ईशम तायडे, दिलीप खैरे, धिरज वझारे, गणेश डोके, महेश गायकवाड, योगिता गायकवाड, तुषार खैरे, सारंग मगर, वैशाली डोके, रोहित डोके आदी उपस्थित होते. निरुपा तायडे यांनी माहिती दिली की, या दालनात ग्राहकांना येवल्याची अस्सल पैठणी आणि सिल्कच्या विविध प्रकारच्या साड्यांचे मोठे कलेक्शन पाहता व खरेदी करता येणार आहे. ‘निरुपाज्’ साडीचे पुण्यातील हे पहिले दालन असून, येथे दोन हजारांपासून सात लाख रुपयांपर्यंतच्या अस्सल हातमाग साड्या उपलब्ध आहेत. पारंपरिक येवला पैठणी, बनारसी, सिल्क, पटोला अशा साड्यांबरोबरच जरदोसी वर्क आणि मोती वर्क केलेल्या नव्या पद्धतीच्या साड्यांचेही उत्तम कलेक्शन येथे आहे. प्रत्येक साडीचा पोत आणि फिनिशिंगकडे विशेष लक्ष दिल्याने येथील साड्या वेगळ्या ठरतात. या सर्व साड्या अस्सल हातमागावर विणलेल्या आणि हाताने कारागिरी केलेल्या असून, त्या थेट कारागिरांकडून तयार करून घेतल्याचे तायडे यांनी सांगितले. अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘निरुपाज्’ची ब्रँड अँबेसेडर असून, नुकतीच तिने कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ‘निरुपाज्’ची साडी परिधान केली होती.
Source link
'निरुपाज् येवला पैठणी' दालनाचे पुण्यात उद्घाटन:प्रा. डॉ. मेधा कुलकर्णींकडून हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन