Headlines

पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे!:मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते सोडले उपोषण; मुख्य आंदोलन तात्पुरते स्थगित




पुण्यातील मांजरी येथे गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले. मात्र, विद्यार्थ्यांनी सध्यातरी फक्त उपोषण मागे घेतले असून, आपले मुख्य आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित केल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनासंदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन राज्य सरकारने त्या मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली होती. या आश्वासक चर्चेनंतर रात्री उशिरा मंत्री अशोक उईके यांनी थेट आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्यास राजी केले. तत्पूर्वी, जोपर्यंत शासनाकडून मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन आणि अधिकृत शासनादेश प्रत्यक्ष हातात मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. मंत्री महोदय आणि शिष्टमंडळ लेखी आदेश घेऊन आल्यानंतरच आंदोलनाची समाप्ती केली जाईल, असे त्यांनी दुपारच्या वेळेस स्पष्ट केले होते. अखेर, प्रशासनाकडून अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले आणि आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *