![]()
पुण्यातील हांडेवाडी येथील करिअप्पा कॅम्पस परिसरातील यशोतेज ॲकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने १० नोव्हेंबर २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलीस तपासात ही आत्महत्या नैराश्यातून आणि संस्थेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ॲकॅडमीचे संस्थापक तेजस पाटील, संचालक व सीईओ विकास पाटील आणि वॉर्डन वसंत सरकटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवधूत उल्हास बडे (वय १६, मूळ रा. बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने निवासी खोली क्रमांक ५१३ मध्ये पंख्याला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले होते. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अवधूतवर त्याच्या रूममेटचे तीन हजार रुपये चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणानंतर वॉर्डनने त्याला ॲकॅडमीमधून काढून टाकण्याची सूचना दिली होती. या दबावामुळे अवधूत मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात गेला होता. महत्त्वाचे म्हणजे, अवधूत अल्पवयीन असतानाही अशा परिस्थितीत त्याचे योग्य समुपदेशन करण्यात आले नाही. तसेच, घडलेल्या प्रकाराची माहिती त्याच्या पालकांनाही वेळेत देण्यात आली नाही. संबंधित पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने आणि आवश्यक काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अवधूतचे आई-वडील दोघेही शिक्षक असून, तो यशोतेज ॲकॅडमीमध्ये ११ वीचे शिक्षण घेण्यासोबतच एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. फुरसुंगी पोलीस ठाण्यात अवधूतचे वडील उल्हास बडे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव करत आहेत.
Source link
बीडच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, ॲकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा:संस्थेच्या निष्काळजीपणामुळे नैराश्यातून टोकाचे पाऊल