Headlines

हृदयद्रावक घटना!:आई-वडिलांसह फिरायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू; कुटुंबावर शोककळा




ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी जवळील अकलोली येथे तानसा नदीपात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारच्या सुट्टीनिमित्त कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यावर काळाने झडप घातली. एकाच घरातील दोन मुलांचा अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. विरार येथे वास्तव्याला असलेले रिक्षाचालक राम बच्चन चौहान हे पत्नी, दोन मुले आणि एका लहान मुलीसह रविवारी वज्रेश्वरी परिसरात आले होते. अकलोली येथील गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळ केल्यानंतर हे कुटुंब तानसा नदीपात्राजवळ गेले. कुटुंबातील सर्वजण सुट्टीचा आनंद लुटत असतानाच या कुटुंबावर अचानक हे मोठे संकट कोसळले. पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना नदीच्या पात्रात उतरलेली दोन्ही मुले खेळता खेळता थोडी आत गेली. पाणी खोल असल्याने आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. नेमक्या याच वेळी आई काहीतरी खाण्यासाठी आणायला गेली होती, तर वडील रिक्षा साफ करत होते. काही वेळाने मुले दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिक तरुणांनी शोध घेऊन तासभराने या दोन्ही मुलांना बाहेर काढले, मात्र नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. चौहान कुटुंबावर दुःखाचा डोंगर अरुण राम बच्चन चौहान (वय 13) आणि आयुष राम बच्चन चौहान (वय 10) अशी या मृत सख्ख्या भावांची नावे आहेत. डोळ्यांदेखत दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी नदीपात्राजवळच हंबरडा फोडला. या हृदयद्रावक घटनेमुळे अकलोली आणि वज्रेश्वरी परिसरात शोककळा पसरली असून, गणेशपुरी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कळवा खाडीत तिघांचा अंत दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील कळवा खाडीत असलेल्या रेतीबंदर गणेश घाट येथेही अशीच एक मोठी दुर्घटना घडली. दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे तिघेही मुंब्रा येथील ठाकूर पाडा परिसरातील रहिवासी होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, एकाच दिवशी घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *