Headlines

"बाळासाहेबांनंतर पक्षात निवडणुका होत नव्हत्या, मनमानी होत होती":एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, मराठा आरक्षणावरही मोठं विधान




शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत लोकशाही पद्धतीने निवडणुका होत नव्हत्या, तर पक्षात मनमानी कारभार सुरू होता, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि पक्षाची मूळ भूमिका बदलण्यात आली, असा दावा करत त्यांनी, “खरी शिवसेना आम्हीच आहोत,” असा पुनरुच्चार केला. दिल्ली येथे शिवसेनेच्या विविध राज्यांतील प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, एनडीएमधील भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यप्रमुखांना तळागाळात जाण्याच्या सूचना “मी दिल्लीला आल्यानंतर राज्यप्रमुखांची बैठक घेत असतो. अनेक दिवसांपासून राज्यप्रमुखांचीही बैठक व्हावी आणि विविध विषयांवर चर्चा व्हावी, अशी मागणी होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली,” असे शिंदे म्हणाले. शिवसेना ही केवळ राजकारण करणारी संघटना नसून समाजकारणाला प्राधान्य देणारी संघटना असल्याचे सांगताना त्यांनी ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ ही शिवसेनेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक प्रश्न, संघटनात्मक अडचणी, गोरगरीबांचे प्रश्न आणि तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यप्रमुखांनी सक्रियपणे काम करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला आघाडी आणि युवा सेनेला मोठ्या प्रमाणात सक्रिय करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. महिलांचे प्रश्न, स्थानिक प्रश्न आणि भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने अधिक प्रभावीपणे काम करावे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. “शिवसेना ही मुळात भूमिपुत्रांची संघटना आहे. त्यामुळे या सर्व विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली,” असे शिंदे यांनी सांगितले. दोन महिन्यांत बूथपर्यंत संघटना मजबूत करण्याचे लक्ष्य शिवसेनेची संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाप्रमुखांपासून ते बूथप्रमुखांपर्यंत सक्षम संरचना उभी करण्याच्या सूचना राज्यप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. “पुढील दोन महिन्यांत संघटनेची ही बांधणी पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. प्रत्येक राज्यप्रमुखाने आपल्या राज्यात संघटना बूथस्तरापर्यंत पोहोचवावी,” असे शिंदे म्हणाले. बैठकीत संघटनेच्या विस्ताराबाबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. एनडीएच्या माध्यमातून निवडणुका लढवणार आगामी विविध राज्यांतील निवडणुकांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. शिवसेना ही महायुती आणि एनडीएचा घटक पक्ष असल्याचे स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तेथे एनडीएच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाण्यात येईल. “ज्या ठिकाणी एनडीएचा घटक पक्ष म्हणून भाजपला शिवसेनेच्या मदतीची गरज असेल, तेथे आम्ही पूर्ण ताकदीने मदत करू. त्याचवेळी ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, त्या जागांबाबतचा प्रस्तावही एनडीएच्या बैठकीत मांडला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या भूमिकेला सर्व राज्यप्रमुखांनी पाठिंबा दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. मोदींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध लोकाभिमुख आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. शिवसेनेचे राज्यप्रमुख आपापल्या राज्यांमध्ये सामाजिक आणि लोकहिताचे कार्यक्रम राबवतील. सर्वसामान्य नागरिकांना मदत करणारे उपक्रम आयोजित करून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. शिवसेनेची बाजू न्यायालयात मांडण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “खरं काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांची घटना आणि त्यांचे विचार नंतर कशा प्रकारे पायदळी तुडवले गेले, हे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले आहे,” असा आरोप शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असलेली पक्षाची विचारधारा आणि त्यानंतरच्या काळात पक्षात झालेल्या बदलांवर त्यांनी टीका केली. “घटना बदलली, विचार बदलले आणि सगळेच बदलण्यात आले. बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवण्यात आले,” असे ते म्हणाले. ‘हिंदुत्व गोठवले, आता धनुष्यबाणही गोठवण्याची मागणी’ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सवाल उपस्थित केला. “बाळासाहेबांचे विचार गोठवण्यात आले, शिवसेनेचे हिंदुत्व बाजूला करण्यात आले आणि आता धनुष्यबाण चिन्हही गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील जनतेने योग्य वेळी आपला निर्णय दिला असून जनतेने आपल्याला स्वीकारले आणि आशीर्वाद दिला असल्याचा दावाही शिंदे यांनी केला. “जनता आमच्या पाठीशी आहे. जनतेने आम्हाला स्वीकारले आहे आणि आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणती, याचा निर्णय जनतेनेही वेळोवेळी दिला आहे,” असे शिंदे म्हणाले. ‘बाळासाहेबांनंतर पक्षात लोकशाही राहिली नाही’ बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत अंतर्गत निवडणुका घेण्यात आल्या नाहीत, असा आरोपही शिंदे यांनी केला. पक्षातील पदाधिकारी आणि विविध पदांवरील नियुक्त्या लोकशाही पद्धतीने न करता मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “ज्या लोकांनी देशातील लोकशाही आणि संविधानाबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या, त्यांनी आधी आपल्या पक्षात लोकशाही आहे का, हे पाहावे. बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षात निवडणुका होत नव्हत्या. केवळ नियुक्त्या आणि मनमानी कारभार सुरू होता,” अशी टीका शिंदे यांनी केली. पक्षातील लोकशाही संपुष्टात आल्यानेच शिवसेनेत असंतोष निर्माण झाला आणि त्यातून पुढील राजकीय घडामोडी घडल्या, असा दावा त्यांनी केला. ‘खरी शिवसेना आम्हीच’ शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केलेला नसल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांनी आपणच बाळासाहेबांच्या मूळ विचारांची शिवसेना पुढे नेत असल्याचे सांगितले. “आम्ही दुसरा पक्ष स्थापन केलेला नाही. आम्ही मूळ शिवसेनेतच आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी आम्ही तडजोड केलेली नाही. त्यामुळे खरी शिवसेना आम्हीच आहोत,” असा ठाम दावा शिंदे यांनी केला. दिल्लीतील बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची देशपातळीवरील संघटनात्मक तयारी सुरू करण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांत बूथस्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. दिशा सालियन प्रकरणावर प्रतिक्रिया दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. “हा उच्च न्यायालयाचा निर्देश आहे आणि न्यायालयीन बाब आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊन सत्य जनतेसमोर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणावरून आधीच्या नेत्यांवर टीका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुती सरकारची कटिबद्धता बोलून दाखवताना शिंदे यांनी आधीच्या मराठा नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. “या राज्याचे नेतृत्व अनेक वर्षे ताकदवान मराठा नेत्यांनी केले, पण अनेक वर्षे प्रलंबित असूनही समाजाला न्याय देण्याचे काम त्यांच्याकडून झाले नाही.” “2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणि आता आमच्या महायुती सरकारने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने पावले उचलली. 10 टक्के आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि 5200 तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम महायुतीनेच केले.” “कोणत्याही ओबीसी किंवा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. शिवसेना पक्ष-चिन्हावर ‘सर्वोच्च’ सुनावणी:मूळ विचारधारेच्या विरोधी पक्षांसोबत गेल्यानेच पक्षात फूट, शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; पुढील सुनावणी 15 सप्टेंबरला शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या हक्कावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्यात आतापर्यंत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. विशेष म्हणजे, ठाकरे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *