Headlines

उर्गेंन आर्ट फेस्टिवलमध्ये ज्येष्ठ कलावंतांचे आवाहन:कलाकारांनी समाजातील उपेक्षितांचे प्रश्न मांडून त्यांचा आवाज बनावे




कलाकारांनी समाजाचे केवळ मनोरंजन न करता, समाजातील उपेक्षित वर्गाचे प्रश्न मांडून त्यांचा आवाज बनण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ कलावंतांनी केले. करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे उर्गेंन आर्ट फेस्टिवलमध्ये आयोजित कलाकार परिसंवादात त्यांनी हे मत व्यक्त केले. या परिसंवादामध्ये ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ चित्रकार मोगलान श्रावस्ती, ज्येष्ठ चित्रकार सवी सावरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी संजय जीवने सहभागी झाले होते. सुधारक ओलवे म्हणाले, पत्रकार म्हणून काम करत असताना माझी आर्थिक परिस्थिती खूप गरीब होती. श्रीमंत लोकांच्या घरी जाऊन त्यांचे फोटो काढणे हे काम मला वेदनादायक वाटत होते. त्यामुळे समाजाचे प्रश्न छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यासाठी मी काम सुरू केले. देवदासी प्रथा, जाती व्यवस्था आणि मुलगी नको अशा प्रकारच्या मानसिकतेसारखे विषय मी माझ्या छायाचित्रांमधून आजपर्यंत मांडत आलो आहे. माझ्या छायाचित्रांमध्ये समाजाचे वास्तव मांडले जात आहे, यात मी समाधानी आहे. सविंद्र सावरकर म्हणाले, कलाकार म्हणून मला जे माझ्या कलेच्या माध्यमातून मांडायचे आहे ते मी निश्चितपणे मांडतो. त्यासाठी मी कोणाचाही दबाव घेत नाही. कोणतीही विपरीत परिस्थिती आली तरी मी माझ्यातील कलाकाराला शांत बसू देत नाही. त्यामुळेच माझी कला समाजाला आणि विशेषतः तरुणांना आकर्षित करत आहे. संजय जीवने म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार न मांडणारी अनेक नाटकं तयार होतात, ही एक प्रकारची समाजाची अधोगती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचा समानतेचा विचार कलेच्या माध्यमातून मांडला गेला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही १९३६ मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राह्मण’ या नाटकाची समीक्षा केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज सुधारक या पलीकडे विविध पैलू आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे. मोगलाण श्रावस्ती म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचा विचार मांडणाऱ्या अनेक लेण्यांची आज दुरवस्था झाली आहे. आपण त्यांच्याकडे समाजाचा वारसा म्हणून पाहिले पाहिजे, परंतु आत्ममग्न झालेला समाज या लेण्यांपासून आणि त्यापासून मिळणाऱ्या शिक्षणापासून दूर गेला आहे. त्यामुळे समाजाची अधोगती सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *