![]()
देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसच्या वतीने आज पुणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या वाढत्या किमती, महागडे शिक्षण, आरोग्यसेवेचा वाढता खर्च तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. या आंदोलनात सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या आंदोलन प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष विशाल तांबे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी वाढत असल्याची आकडेवारी आणि त्यासंदर्भातील सकारात्मक बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. मात्र, दुसरीकडे सामान्य नागरिकाच्या ताटात पोहोचणारी प्रत्येक वस्तू महाग होत आहे. ही विसंगती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. महागाईचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य कुटुंबांना आणि विशेषतः गृहिणींना बसत आहे. घरातील किराणा, भाजीपाला, दूध, स्वयंपाकाच्या वस्तू, शिक्षणाचा खर्च, मुलांच्या शैक्षणिक गरजा, रुग्णालयातील उपचार आणि औषधांचा खर्च यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे. उत्पन्न वाढीचा वेग आणि खर्च वाढीचा वेग यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांसमोर घर चालवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचे सांगितले जात असले, तरी त्या आर्थिक वाढीचा प्रत्यक्ष फायदा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात दिसून येत नाही, असे तांबे यांनी स्पष्ट केले. या आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा मनाली भिलारे म्हणाल्या की, महागाई कमी करण्यासाठी सरकारने आता ठोस पावले उचलली नाहीत, तर सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढतील, असे त्या म्हणाल्या. जनतेला केवळ आश्वासने नकोत, तर त्यांच्या रोजच्या जीवनात जाणवेल असा प्रत्यक्ष दिलासा हवा आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या ताटातील अन्नधान्यापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत आणि आजारपणातील उपचारांपासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग होत असेल, तर या आर्थिक विकासाचा फायदा नेमका कोणाला होत आहे? महागाई ही केवळ आर्थिक आकडेवारीचा विषय नसून ती थेट सामान्य नागरिकाच्या जगण्याशी जोडलेली समस्या आहे. वाढत्या खर्चामुळे कुटुंबांच्या बचतीवर परिणाम होत आहे, जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी नागरिकांना काटकसर करावी लागत आहे आणि अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आणि भयावह असल्याचे देखील मनाली भिलारे यांनी नमूद केले. यावेळी बोलताना महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे म्हणाल्या की, महागाई वाढत असताना सर्वसामान्य नागरिकांना खर्च कमी करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे किंवा सोन्यासारख्या वस्तूंची खरेदी टाळण्याचे सल्ले दिले जातात. मात्र, सरकारने नागरिकांच्या उत्पन्नाचा विचार करण्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त करण्यासाठी काय केले, याचे उत्तरही जनतेला मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Source link
पुण्यात राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसचे महागाईविरोधात थाळीनाद आंदोलन:दैनंदिन वस्तू, शिक्षण, आरोग्य आणि इंधनाच्या वाढत्या किमतींवरून सरकारला घेरले