Headlines

कै. केशवराव नांदेडकर यांच्या जीवनातून समर्पित वृत्तीची प्रेरणा:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रद्धांजली सभेत दिलीप क्षीरसागर यांचे गौरवोद्गार




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी कै. केशवराव नांदेडकर यांच्या जीवनातून समर्पित वृत्तीने समाज आणि संघटन कार्यात सातत्याने कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मूळचे धुळे येथील आणि सध्या सिंहगड परिसरात राहणाऱ्या संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. केशवराव नांदेडकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी क्षीरसागर बोलत होते. क्षीरसागर म्हणाले की, कै. नांदेडकर यांनी संघटन आणि समाजपरिवर्तन या दोन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटवला. होशंगाबाद येथे पूर्णवेळ संघ प्रचारक म्हणून काम केल्यानंतर गृहस्थ जीवनातही त्यांनी धुळे जिल्हा आणि देवगिरी प्रांतातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. संघकार्य वाढवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांची संघटना उभारण्यात संस्थापक म्हणून त्यांचे मोठे योगदान होते. निवृत्तीनंतरही त्यांनी कठीण परिस्थितीत असलेल्या पूर्वोत्तर भारतातील मिझोराममध्ये राष्ट्रीय विचारांचे काम उभे करण्यासाठी काम केले. धुळे परिसरातील विविध संस्थांमध्येही त्यांनी पदाधिकारी म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी डॉ. लीना मेहेंदळे यांनी नांदेडकर कुटुंबाशी असलेल्या तीन पिढ्यांच्या संबंधांच्या आठवणी सांगितल्या. कौशलम न्यासाला कै. नांदेडकर यांचे नेहमी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नॅशनल मेडिको ऑर्गनायझेशनच्या वतीने डॉ. शरद अगरखेडकर यांनी राष्ट्रीय संघटन उभारणीतील त्यांचे योगदान, कार्यावरील निष्ठा आणि काम पूर्ण करण्याचा ध्यास याविषयी आपले विचार मांडले. विविध वैद्यकीय महाविद्यालयांत संघटनेचे कार्य पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विश्वास कुलकर्णी, विश्वास ओढेकर, पुत्र आशुतोष नांदेडकर यांनीही आठवणींना उजाळा दिला. सिंहगड भाग संघचालक सचिन नागपुरे, दिलीप कस्तुरे, प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, डॉ. शरद कुंटे, अनघा आठल्ये यांच्यासह कुटुंबीय आणि मान्यवर उपस्थित होते. सौ. कीर्ती कस्तुरे यांनी भजन सादर करून श्रद्धांजली सभेचा समारोप केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *