![]()
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याचे दुःख त्यांच्या आईला, मुलांना आणि आपल्याला सर्वाधिक आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. “अजितदादांच्या जाण्याचे दुःख किती आहे, हे माझी मुले आणि माझ्यापेक्षा अधिक कुणाला माहिती असणार?” असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. “दादांची आई, दादांची मुले आणि मी… आमच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला कळणार?” असेही त्यांनी विचारले. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी आणि तपासाच्या गतीबद्दल सतत प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तपास यंत्रणांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. “सतत माध्यमांसमोर येणे किंवा रोज नवी माहिती समोर येणे म्हणजेच तपास सुरू आहे, असे नाही,” असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात वारंवार ‘मीडिया ट्रायल’ होत असल्याची खंत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. तपास पूर्ण होण्यापूर्वीच निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले. “दादांच्या जाण्याचे राजकारण कुणीही करू नये, असे मला मनापासून वाटते,” असे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनी अपघाताच्या एफआयआर आणि तपासाबाबत सरकारला प्रश्न विचारले होते. रोहित पवार यांनीही चौकशीच्या मुद्द्यांवर संशय व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील राजकीय मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
Source link
अजित पवार अपघाताचे राजकारण करू नका:सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाल्या- दुःख आम्हालाच जास्त