![]()
मुख्यमंत्री कार्यालय आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पांतर्गत (IVDP) चिखलदरा तालुक्यातील २३ गावांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (आयएएस) यांनी दिले आहेत. या गावांमध्ये पात्र लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत आवश्यक कागदपत्रे दिली जातील, असेही यावेळी सांगण्यात आले. प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सत्यम गांधी यांनी नुकताच चिखलदरा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात शहापूर, सलोना, भुलोरी, खडीमल, मोथा, गौलखेडा बाजार आणि खटकाली या ७ ग्रामपंचायतींमधील २३ गावांमध्ये झालेल्या कामांचा आणि प्रलंबित गरजांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत शहापूर येथे सायंकाळी आढावा बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला टाटा ट्रस्टचे तालुका समन्वयक शुभम वरखडे आणि गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या बेसलाईन सर्वेक्षणाची माहिती दिली. गावनिहाय गरजा आणि त्यानुसार पूर्ण केलेल्या कामांचे सादरीकरणही त्यांनी केले. यामध्ये अंगणवाडी दुरुस्ती, शाळांना संरक्षण भिंती, मोथा येथील शाळेतील स्वच्छतागृह, आलाडोह, लवादा आणि शहापूर येथील शाळांमध्ये सौरऊर्जा सुविधा व रंगरंगोटी या कामांचा समावेश होता. तसेच झिंगापूर आणि खडीमल येथे नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष शिबिरांचाही आढावा घेण्यात आला. या शिबिरांमधून लाभ मिळालेल्या नागरिकांची माहितीही सादर करण्यात आली. सत्यम गांधी यांनी सांगितले की, ‘प्रकल्पातील सहा उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता हेच आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. केवळ कामे पूर्ण करण्यापेक्षा त्याचा थेट आणि परिणामकारक लाभ गावातील प्रत्येक पात्र कुटुंबाला मिळतो आहे का, यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे.’ यावेळी शहापूरचे माजी उपसरपंच बाबूजी यांनी नागरिकांच्या वतीने विविध मागण्या मांडल्या. या दौऱ्यावेळी तहसीलदार जीवन मोराणकर, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन गारुळे, गटशिक्षणाधिकारी भटेसिंग गिरासे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश सरोदे, सहाय्यक अभियंता कमलेश काळे, ग्रामसेवक हिवे, माजी उपसरपंच बाबूजी, टाटा मोटर्सचे तालुका समन्वयक शुभम वरखडे यांच्यासह नागरिक, शिक्षक, केंद्रप्रमुख, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळघाटातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जन्म प्रमाणपत्राअभावी आधारकार्डापासून वंचित बालके, पाणीटंचाई, स्मशानभूमीचा अभाव आणि वीज जोडणी या प्रश्नांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींचा वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
Source link
चिखलदरा तालुक्यातील 23 गावांच्या विकासाला गती देण्याचे निर्देश:जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आदेश, डिसेंबरपर्यंत कागदपत्रे देण्याचे उद्दिष्ट