Headlines

मंगरुळ चव्हाळा ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात 'भिक मांगो' आंदोलन:बीडीओकडे तक्रार करूनही दुर्लक्ष, ग्रामसभा घेण्याची आणि विकासकामांमध्ये पारदर्शकतेची मागणी




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा गावातील युवकांनी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ‘भिक मांगो’ आंदोलन केले. अनेक वर्षांपासून ग्रामसभा होत नसल्याने आणि सर्व निर्णय चार भिंतींच्या आत घेतले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. गावातील तातडीची विकास कामे करण्यासाठी आता गावकऱ्यांकडे भीक मागण्याशिवाय दुसरा उपाय राहिला नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी हे आंदोलन हाती घेतले. यापूर्वी गावकऱ्यांनी याबाबत बीडीओकडे तक्रार केली होती, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. नियमित ग्रामसभा व्हावी, लोकांचे म्हणणे ऐकून त्यांचे प्रश्न सोडवावेत आणि गावाच्या विकासासाठी आवश्यक निर्णय घेऊन ठराव मंजूर करावेत, अशी त्यांची मागणी आहे. गावात झालेल्या विकासकामांचे फलक कामाचे ठिकाण आणि ठेकेदारांच्या माहितीसह लावावेत. गावाच्या विकासासाठी मिळालेला शासकीय निधी, खर्च झालेला निधी, शिल्लक निधी आणि काम पूर्ण न झाल्याने परत गेलेला निधी या सर्व व्यवहारांचे फलक लावून पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही या आंदोलनाद्वारे करण्यात आली. जवळच्या कंपन्या आणि कारखानदारांकडून मिळणारा निधी व कराचा हिशोब विचारतानाच, जलजीवन मिशनमध्ये झालेल्या संशयास्पद कारभारावरही आंदोलनकर्त्यांनी बोट ठेवले आहे. गावातील सार्वजनिक शौचालय, रस्ते, नाल्या, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा आणि सर्व सोयींनी युक्त गाव तयार करून एक आदर्श ग्रामपंचायत बनवण्याची मानसिकता तयार करावी, अशी संबंधितांची मागणी आहे. मात्र, गावात अनेक वर्षांपासून संगनमताने राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे हे शक्य होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व मागण्यांसाठी ग्रामपंचायतीच्या निषेधार्थ हे ‘भिक मांगो’ आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या मागण्या आणि ग्रामपंचायतीच्या आडमुठ्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा बीडीओ तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वीही अशी निवेदने देण्यात आली होती, पण अद्याप ना ग्रामसभा झाली, ना कुठली मागणी मान्य झाली. त्यामुळे भविष्यात याहून मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे मंगरुळ चव्हाळा येथील युवकांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *