![]()
कुटुंब घराला कुलूप लावून फिरायला गेलं असताना चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना भिवंडी शहरातील कापआळी परिसरात घडली आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड असा मोठा ऐवज चोरून नेला. चोरी केल्यानंतर दागिन्यांनी भरलेली बॅग खांद्यावर अडकवून चोरटा जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. धर्मेंद्र लालचंद केसरवाणी हे पत्नी आणि मुलांसह घराला कुलूप लावून घुंटणगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. कुटुंबीय मध्यरात्रीच्या सुमारास, सुमारे 1 वाजता घरी परतले. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात प्रवेश केल्यानंतर तपासणी केली असता लोखंडी कपाटाचे लॉकरही फोडण्यात आल्याचे दिसून आले. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड चोरून नेली होती. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, बांगड्या, झुमके तसेच इतर दागिन्यांचा समावेश असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याशिवाय चांदीच्या पायली आणि रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार 23.5 तोळे सोनं चोरीला केसरवाणी कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घरातून 23.5 तोळे सोनं, 500 ग्रॅम चांदी आणि 1 लाख 20 हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला आहे. या सोन्याच्या दागिन्यांची अधिकृत बिले आपल्याकडे असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले आहे. मात्र, पोलिसांच्या नोंदीनुसार या प्रकरणात 10 तोळे सोन्याच्या चोरीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या सोन्याच्या एकूण प्रमाणाबाबत कुटुंबीय आणि पोलिसांच्या नोंदीमध्ये फरक असल्याचे समोर आले आहे. चोरीनंतर बॅग घेऊन जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद घरफोडीनंतर चोरटा चोरी केलेला ऐवज एका बॅगेत घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. विशेष म्हणजे चोरट्याने बॅग खांद्यावर ऐटीत अडकवली होती. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चोरट्यांनी ज्या बॅगेत चोरीचा ऐवज भरला होता, ती बॅग घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पोलिसांना मिळून आली. त्यामुळे या बॅगेचा आणि त्यातील वस्तूंचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. भिवंडी शहर पोलिसांकडून तपास सुरू घटनेनंतर धर्मेंद्र केसरवाणी यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरटा कोणत्या दिशेने गेला, त्याच्यासोबत आणखी कोणी होते का आणि चोरीपूर्वी त्याने घराची रेकी केली होती का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. जीवनभराची कमाई चोरीला गेल्याने कुटुंबीय चिंतेत केसरवाणी कुटुंबीयांनी मुलांच्या भविष्यासाठी आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने हा ऐवज जमा केला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करावी आणि चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे कापआळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरांना चोरटे लक्ष्य करत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. हेही वाचा.. FDAच्या कारवाईवर हायकोर्ट संतापलं:तुकाराम मुंढेंच्या विभागाला खडेबोल, काय आहे प्रकरण? राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवायांदरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासन विभागाची कानउघडणी केली आहे. एखाद्या आस्थापनाने अन्नसुरक्षा नियमांमधील त्रुटी दूर केल्यानंतरही त्याचा परवाना निलंबित ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने FDA ला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सविस्तर वाचा..
Source link
कुटुंब फिरायला गेलं अन् चोरट्यांनी घर फोडलं:23.5 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी आणि 1.20 लाखांची रोकड चोरी