![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी राज्य शासनाने एक ‘टास्क फोर्स’ नेमला आहे. हा टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी अमरावतीत येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात हा टास्क फोर्स विद्यार्थी, एमपीएससीचे परीक्षार्थी आण
.
एमपीएससी परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्समध्ये पाच वरिष्ठ सनदी अधिकारी, यूपीएससीचे माजी सदस्य आणि एनआयटीचे एक प्राध्यापक असे एकूण सात जण आहेत.
राज्यात विभागवार दौरे केल्यानंतर हा टास्क फोर्स शासनाला काही शिफारसी सादर करेल. त्यानंतर एमपीएससीच्या रचनेत, विशेषतः परीक्षेच्या आयोजनात मोठे बदल केले जातील.
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील विविध पदभरतीसाठी एमपीएससीमार्फत परीक्षा घेतल्या जातात. मात्र, अलीकडच्या काळात काही परीक्षा वादग्रस्त ठरल्या आहेत. पेपरफुटीमुळे काही परीक्षा वारंवार रद्द कराव्या लागल्या, तर काही परीक्षांच्या मूल्यांकनातील चुका स्पष्टपणे समोर आल्या. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर आंदोलने सुरू आहेत.
वर्षानुवर्षे मेहनत केल्यानंतर उमेदवार ही परीक्षा देतात. पण परीक्षा दिल्यानंतर त्यातील गैरव्यवहार उघड झाल्यामुळे सर्वांनाच पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. अनेक उमेदवारांचे वय वाढल्यामुळे त्यांच्या संधी हिरावल्या जातात. त्यामुळे भरतीसाठीची परीक्षा अगदी व्यवस्थित व्हावी, अशी मागणी आंदोलनांद्वारे पुढे आली आहे.
यामुळेच शासनाने हा टास्क फोर्स नेमून त्याद्वारे सुधारणा मागवल्या आहेत. भरतीसाठीची परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. टास्क फोर्सच्या भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून लवकरच जाहीर केली जाईल.
सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा या टास्क फोर्सच्या अध्यक्ष आहेत. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी हे सदस्य सचिव आहेत. याशिवाय पोलिस महासंचालक सदानंद दाते, शासनाच्या आयटी व एआय विभागाचे सचिव वीरेंद्रसिंह आणि नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम हे तीन वरिष्ठ सनदी अधिकारी त्यात आहेत. आयआयटी मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे आणि यूपीएससीचे माजी सदस्य एशर मार्शल अजित भोसले यांचाही टास्क फोर्समध्ये समावेश आहे.
या बदलांसाठी सामान्य नागरिकांकडून सूचना व तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. १७ सप्टेंबर रोजीच्या बैठकीसाठी नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे. यावेळी टास्क फोर्समधील अधिकारी विद्यार्थी, उमेदवार, त्यांचे पालक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि संबंधित घटकांशी थेट संवाद साधतील. तत्पूर्वी, नागरिक आणि संबंधित हितधारक amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर आपल्या सूचना आणि अभिप्राय पाठवू शकतात.