![]()
श्री आगमनाच्या जल्लोषासाठी सज्ज झालेल्या सातारा शहरातील राजवाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी अचानक आगीचा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य ड्रॅगनच्या प्रतिकृतीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने लगतच्या आणखी एका प्रतिकृतीला कवेत घेतल्याने घटनास्थळी अक्षरशः धावपळ उडाली. या दुर्घटनेत मंडळाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ठेवलेला जनरेटर जळून खाक झाला. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. राजवाडा परिसरात श्री आगमन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच ड्रॅगनच्या प्रतिकृतीला आग लागल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. आग वेगाने पसरू लागल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिका अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली. त्याचवेळी किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेचीही मदत घेण्यात आली. दोन अग्निशमन यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, मंडळाचा जनरेटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळाला. दरम्यान, राजवाडा बसस्थानकासमोर श्री आगमन सोहळ्यामुळे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाले. आगीची घटना घडताच सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या श्री आगमन मिरवणुकांमधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रतिकृती, विद्युत उपकरणे, जनरेटर आणि गर्दी यांचा मेळ घालताना आवश्यक ती खबरदारी घेतली जाते का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी घटनेची दूरध्वनीवरून माहिती घेतली. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Source link
ड्रॅगन पेटला अन् सातारा शहरात राजवाडा परिसरात उडाली पळापळ!:सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीत थरार