![]()
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या पंचपार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच निवडणुकीसमोरील न्यायालयीन अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. अवसानातील 492 दूध संस्थांना पात्र ठरवून अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला आता सर्वोच्य न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्या मुळे या 492 संस्थांना प्रत्यक्ष मतदान करता येणार की नाही, या वर पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाल आहे. कोल्हापूर सर्किट बेंच व विभागीय उपनिबंधकांनी अवसायनातील 492 दूध संस्थांना पात्र ठरवून गोकुळच्या अंतिम मतदार यादीत त्यांचा समावेश केला होता. मात्र, या निर्णयाविरोधात इस्पुर्ली (ता. करवीर) येथील ‘श्रीराम दूध संस्थे’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तूळात खळबळ सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज सुरू होण्याच्या आधीच नवा वाद गोकुळ निवडणुकीसाठी 15 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्या काही दिवस आधीच ही याचिका दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर मंगळवारी सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर काय निर्णय होतो, त्यानुसार 492 संस्थांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पात्र ठरलेल्या या संस्थांचा अंतिम मतदार यादीतील समावेश कायम ठेवावा आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी आमदार सतेज पाटील यांनी भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाईत या संस्थांची बाजू मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या वतीने ॲड. आनंद लांडगे न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. सहा महिन्यांपासून गोकुळ निवडणूक न्यायालयीन वादात गोकुळची निवडणूक प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सातत्याने न्यायालयीन वादांमुळे चर्चेत आहे. पात्र-अपात्र दूध संस्थांचा मुद्दा, मतदार यादी आणि संस्थांना मतदानाचा अधिकार या प्रश्नांवर विविध स्तरांवर कायदेशीर लढाई झाली. अवसायनातील संस्थांना मतदानाचा अधिकार मिळावा की नाही, हा त्यातील प्रमुख मुद्दा ठरला आहे. या संस्थांच्या पात्रतेबाबत झालेल्या निर्णयानंतर अंतिम मतदार यादीत त्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात त्यालाच आव्हान मिळाल्याने निवडणूक प्रक्रिया पुन्हा कायदेशीर कसोटीवर आली आहे. 1400 पात्र संस्थांचा ‘सत्यविजय’ मेळावा दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीत पात्र ठरलेल्या सुमारे 1400 दूध संस्थांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील सहा महिन्यांत न्यायालयीन प्रक्रियेतून गेल्यानंतर या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पात्र दूध संस्थांच्या वतीने ‘सत्यविजय कृतज्ञता मेळावा’ आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात निवडणूक प्रक्रियेत संस्थांना अपात्र ठरवण्यासाठी काही अदृश्य शक्ती प्रयत्नशील असल्याचा आरोप करण्यात आला. या कथित प्रयत्नांविरोधात पात्र दूध संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. आगामी गोकुळ निवडणुकीत अशा ‘अदृश्य शक्ती’ला मतदान न करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असताना दुसरीकडे 492 संस्थांच्या पात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर काय भूमिका घेते, 492 संस्थांचा अंतिम मतदार यादीतील समावेश कायम राहतो की त्यावर काही बदल होतो, यावर निवडणुकीतील समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या संभाव्य सुनावणीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. गोकुळच्या निवडणुकीत पात्र संस्थांची संख्या, मतदानाचा अधिकार आणि मतदार यादीचा वाद हा आता केवळ सहकार विभागापुरता मर्यादित राहिलेला नसून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही गोकुळच्या निवडणुकीतील पुढील घडामोडी न्यायालयीन निर्णयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहेत. हेही वाचा.. माझा भाऊ जे करेल ते शांततापूर्वकच करेल!:जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या- आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील! मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचे ते शांततापूर्वकच करेल, असा मला विश्वास आहे,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..
Source link
गोकुळ’ निवडणुकीआधी मोठा पेच:492 अवसायनातील दूध संस्थांच्या पात्रतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह