![]()
अमरावती शहरातील कोणार्क कॉलनी (कठोरा नाका) परिसरात पुन्हा रानडुकराचा वावर दिसून आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुक्कर थेट नागरी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. यापूर्वी रानडुकराच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे याच भागात रानडुक्कर फिरत असल्याने मनपा आणि वन प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. कोणार्क कॉलनीतील रहिवासी श्रीनाथ वानखडे यांना दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री सव्वा वाजता कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. ते कुतूहलापोटी घराबाहेर आले असता, त्यांना एक मोठे रानडुक्कर दिसले. त्याच्यामागे १५ ते २० कुत्रे मोठ्याने भुंकत होते. गेल्या एका आठवड्यापासून दररोज मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडत असल्याचे वानखडे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिका आणि वन प्रशासनाने वेळीच जागे होऊन त्या रानडुकराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे आली आहे. शहरात रानडुकरांच्या प्रवेशाबद्दल मनपा अधिकाऱ्यांना सुरुवातीला माहिती नसल्याचे दिसून आले. मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वनविभागाला पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. प्रशासनाने कोणताही अपघात होण्याची वाट न पाहता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. तसेच, परिसरातील साफसफाई मोहीम राबवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे यांनी केली आहे. गोविंद पिंजरकर यांच्यावरील रानडुकराच्या हल्ल्यानंतर येथील मोठ्या नाल्यावरील सुरक्षा भिंतीच्या बांधकामाची मागणी जोर धरू लागली होती. या परिसरातील नाली सफाईचा प्रश्नही गंभीर असून, नगरसेवक आपल्या कामात व्यस्त असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांपूर्वी २४ जून रोजी आशियाड कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने हल्ला केला होता. काही दिवसांच्या उपचारानंतर गोविंद पिंजरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच काळात कॉटन ग्रीन कॉलनीत एका वासरावर आणि एका महिलेच्या अंगावर रानडुक्कर धावल्याच्या घटनाही घडल्या होत्या.
Source link
कोणार्क कॉलनीत पुन्हा रानडुकराचा वावर:नागरिकांमध्ये भीती; मनपा आणि वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी