Headlines

इतवारा बाजार-नागपुरी गेट उड्डाणपुलाचे काम रखडले:काँग्रेसने केले आंदोलन; काम पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा संकल्प




अमरावती शहरातील इतवारा बाजार-नागपुरी गेट उड्डाणपुलाचे काम अनेक महिन्यांपासून थांबले आहे. हे अर्धवट काम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी अमरावती शहर काँग्रेस कमिटीने शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी आंदोलन केले. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नागपुरी गेट पोलीस स्टेशन चौकात सकाळी ११ वाजता हे आंदोलन झाले. खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, मनपातील विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या उड्डाणपुलाचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. राज्यात भाजप-महायुतीचे सरकार आल्यानंतर हे काम थांबले. अनेक वर्षांपासून काम अपूर्ण असल्याने या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होतो. हा उड्डाणपूल केवळ एका भागापुरता मर्यादित नसून, अमरावती शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. काम थांबल्यामुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि पैसा वाया जात असून, शहराच्या विकासावरही परिणाम होत आहे. राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ११ सप्टेंबर रोजी पुलाच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी अमरावतीच्या आमदारांनी त्यांना शहरातील रेल्वे उड्डाणपूल आणि इतर थांबलेल्या विकासकामांची माहिती दिली. मात्र, पश्चिम भागातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या उड्डाणपुलाची माहिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली नाही, असा आरोप काँग्रेसने केला. या महत्त्वाच्या प्रश्नाची माहिती देण्यासाठी डॉ. सुनील देशमुख यांनी स्वतः बांधकाम मंत्र्यांची भेट घेऊन उड्डाणपुलाच्या थांबलेल्या कामाची पूर्ण माहिती दिली. आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास देणाऱ्या या कारभाराविरोधात आता जनआंदोलन उभे केले जाईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने निश्चित वेळ जाहीर करावी आणि कामाला गती द्यावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. या आंदोलनात सुरेश रतावा, हाजी नज़ीर खान, नसीम खान, अब्दुल रफीक पत्रकार, सादिक शाह, गुड्डू हमीद, मोहम्मद रेहान उर्फ बल्ला भाई, नितीन काळे, हाजी निसार, जावेद साबिर, अफजल चौधरी, डॉ मतीन, डॉ आबिद, अमीर शेख, डॉ फिरोज़खान यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *