Headlines

वास्तुविशारद हफीझ कॉन्ट्रॅक्टर: स्मार्ट शहरांसाठी 3D, उच्च घनतेचे बांधकाम आवश्यक:वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमीन; जंगले वाचवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण गरजेचे




पद्मभूषण विजेते प्रसिद्ध वास्तुविशारद हफीझ कॉन्ट्रॅक्टर यांनी म्हटले आहे की, वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत असताना शेतजमीन, जंगले आणि पाणथळ जागांचे नुकसान करणे परवडणारे नाही. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेताना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्रिमितीय (3D) आणि उच्च घनतेच्या बांधकाम पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) येथे ‘हफीझ कॉन्ट्रॅक्टर स्कूल ऑफ आर्किटेक्चर’च्या उद्घाटन परिषदेत बोलत होते. या वेळी फाईन ज्वेलर्सचे पवन आनंद, वास्तुविशारद पुष्कर कानविंदे आणि एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड उपस्थित होते. प्राध्यापक, विद्यार्थी आणि वास्तुकला, डिझाइन व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञही या परिषदेला हजर होते. कॉन्ट्रॅक्टर म्हणाले, शहरांची वेगाने वाढ होत असल्याने पारंपरिक बांधकाम आणि शहर नियोजनाच्या पद्धतींचा पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. शहरांचा विस्तार करताना शेती आणि जंगलांचे क्षेत्र कमी करणे पर्यावरणासाठी धोकादायक आहे. त्यामुळे उपलब्ध जागेचा अधिक चांगला वापर करण्यासाठी उंच इमारती आणि त्रिमितीय शहर नियोजनाचा विचार करावा लागेल. भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून इमारतींची रचना करणेही गरजेचे आहे. भविष्यातील शहरांची रचना पुढील पिढ्यांचे भविष्य ठरवणार असल्याने विद्यार्थ्यांनी नव्या संकल्पनांवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. डॉ. राहुल कराड यांनी सांगितले की, वास्तुकला मानवी जीवन आणि शहरी अनुभवांना आकार देते. कृत्रिम बुद्धिमत्तेसह तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन उद्योग आणि शिक्षणसंस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करावे, असे त्यांनी नमूद केले. या परिषदेत शाश्वत विकास उद्दिष्टे, पर्यावरणपूरक डिझाइन, वास्तुकलेतील तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांची तयारी या विषयांवर तज्ज्ञांच्या दोन गोलमेज चर्चा झाल्या. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी थेट संवाद साधत प्रश्नोत्तरांमध्ये सहभाग घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *