![]()
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच, गेल्या 15 दिवसांपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता सर्व मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, जरांगे पाटील हे मुंबईत धडकण्यापूर्वीच राज्य सरकारने त्यांच्याशी चर्चा करून यातून योग्य तो मार्ग काढावा, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे. रोहित पवार म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आजच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी आणि चर्चेतून तोडगा काढावा. जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी गेल्यास आंदोलकांसोबतच मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याआधीच सरकारने पुढाकार घेऊन चर्चा कारावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. आझाद मैदानात उपोषणाचा निर्धार आणि महिलांचा पाठिंबा उपोषणाच्या 15 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत 20 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा देत, अंतरवली सराटी येथे उपस्थित असलेल्या महिला आंदोलकांनीही त्यांच्यासोबत मुंबईच्या लढ्यात सहभागी होण्याची आग्रही मागणी केली. महिलांच्या या मागणीवर जरांगे पाटील यांनी त्यांना आझाद मैदानावर येण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या घरी हळदी-कुंकू घेऊन जाण्याचा अनोखा सल्ला दिला. तसेच, “सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकू घेऊन जर या महिला गेल्या आणि त्यांनी ते स्वीकारले नाही, तर ते कसले हिंदू?” असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मनोज जरांगेंचा एल्गार, 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करणार:पाटोदा-खोपोलीमार्गे थेट आझाद मैदानात आमरण उपोषण; मार्ग जाहीर करताना जरांगे भावुक मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि सगेसोयरे तसेच कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. आपल्या आमरण उपोषणाच्या 15व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी मुंबईला जाण्याचा सविस्तर मार्ग, मुक्काम आणि आंदोलनाची संपूर्ण रणनीती जाहीर केली. “ही मराठ्यांची अंतिम आणि निर्णायक लढाई असून, आपण शांततेच्या मार्गाने मुंबईत जाऊन जिंकूनच माघारी येणार आहोत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर
Source link
मनोज जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा:परिस्थिती चिघळण्याआधीच तोडगा काढा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला