![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, आता मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने निघण्याचा निर्णय जाहीर केला. 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय असेल, याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. दरम्यान, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली.जरांगे पाटील यांच्या नियोजित दौऱ्यानुसार 15 सप्टेंबरला ते अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होतील. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होणार आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, 17 सप्टेंबरला पुण्यातील हडपसर आणि 18 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुक्काम करण्याचे नियोजन आहे. 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा त्यांचा इरादा आहे. सरकारकडून चर्चेचा प्रयत्न सुरू जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर सरकारची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. याबाबत गिरीश महाजन यांनी सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.मात्र, आंदोलनासाठी निवडण्यात आलेल्या वेळेबाबत महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. महिला, मुले आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर असतात. त्यामुळे अशा काळात मुंबईत मोठं आंदोलन झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी सरकारची चिंता असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. गिरीश महाजन म्हणाले की, आंदोलन करणे, उपोषण करणे किंवा मोर्चा काढणे हा आंदोलकांचा अधिकार आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करण्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई आंदोलनासाठी परवानगीचा मुद्दा महत्त्वाचा दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासंदर्भात न्यायालयीन बाबीही समोर आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेण्याची बाब स्पष्ट केली आहे. परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने मांडली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता एकीकडे सरकारकडून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे त्यांच्या मुंबई आंदोलनासाठी परवानगी मिळणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चा कोणत्या दिशेने जाते आणि आंदोलनाबाबत काय तोडगा निघतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा… हॉटेल बुकिंगबाबत नवीन नियमावली:OYO बुकिंगची नोंद ठेवणे बंधनकारक- बावनकुळे; मराठा आरक्षणावरही केले भाष्य नागपूरमध्ये ओयो हॉटेल आणि रूम बुकिंग सेवांबाबत पोलिसांनी नवीन नियमावली तयार केली आहे. याबाबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तयार केलेल्या नियमावलीचे त्यांनी स्वागत केले. सविस्तर वाचा..
Source link
जरांगेंच्या मुंबई आंदोलनाने सरकारची चिंता वाढली:गिरीश महाजन म्हणाले – ही वेळ योग्य नाही