Headlines

नांदगावचे सार्वजनिक बांधकाम कार्यालय 28 किमी दूर बडनेरात:नागरिकांना कामांसाठी वारंवार हेलपाटे; 27 वर्षांपासून मागणी प्रलंबित




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय तालुक्यात नसून तब्बल २८ किलोमीटर दूर बडनेरा येथे आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रशासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. तालुक्यातील इतर सर्व प्रमुख शासकीय कार्यालये नांदगाव खंडेश्वर येथे असताना, हे कार्यालय बडनेरा येथे का ठेवले, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यावर लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अमरावती येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय असताना, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी न ठेवता बडनेरा येथे ठेवण्यामागचे कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा विस्तार मोठा आहे. येथील रस्ते, पूल, शासकीय इमारती आणि इतर कामांसाठी नागरिकांना २८ किलोमीटर दूर बडनेरा येथे वारंवार जावे लागते. अनेकदा कार्यालयात गेल्यावर अधिकारी उपलब्ध नसतात. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परत यावे लागते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रवास करावा लागतो. एका कामासाठी नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यांच्यात संताप आहे. कार्यालय दूर असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. हे कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी आहे की अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या, असा प्रश्न नांदगावचे नागरिक विचारत आहेत. या आरोपांवर प्रशासनाने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. तसेच, लोकप्रतिनिधी हा प्रश्न शासनासमोर प्रभावीपणे का मांडत नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे. नांदगाव खंडेश्वर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी १९९९ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तब्बल २७ वर्षे उलटूनही या मागणीवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या काळात अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बदलले, तरी नांदगावच्या नागरिकांचा हा मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *