Headlines

'माय मरो पण मावशी जगो..!':देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला; काय आहे प्रकरण?




“मराठी भाषा माझी आई, तर हिंदी माझी मावशी असून आईसोबत मावशीचाही सन्मान व्हायला हवा,” या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना दानवे यांनी त्यांना खोचक टोला लगावत, “मराठीत एक म्हण आहे. माय मरो पण मावशी जगो..! बरोबर ना फडणवीस साहेब,” असा टोला दानवे यांनी लगावला आहे. आज नवी मुंबईच्या वाशी येथे सिडको प्रदर्शन सेंटरला हिंदी दिवस आणि हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मातृभाषा शिकलीच पाहिजे, याचा समावेश नव्या शिक्षण धोरणातही केला गेला आहे. मातृभाषेसोबतच इतर एक भाषा शिकण्याचा समावेश त्यात आहे. मराठी ही माझी आई आहे आणि देशातील इतर भाषा मावशी सारख्या आहेत. आईचा गौरव करताना मावशांचाही सन्मान राखला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, आम्हाला भारतातील प्रत्येक भाषा समृद्ध करायची आहे. राज्यभाषेच्या समृद्धीसाठी आम्ही सिंधू शब्दकोश तयार केला आहे. मी याबद्दल नंतर अधिक सांगेन, पण वीर सावरकरांनी सर्व शब्दांचे पुनरावलोकन केले होते. आपल्या सर्वांना सवरकार आठवतात. ते एक महान स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होते. पण सावरकर हे त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ होते, त्यांनी असे अनेक शब्द तयार केले जे आपल्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध नव्हते आणि त्या सर्व शब्दांना राजभाषा असलेल्या मराठीत आणि देशातील इतर सर्व भाषांमध्ये सहज स्वीकृती मिळाली, अशी माहिती शहा यांनी दिली. दरम्यान, या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. “मराठीत एक म्हण आहे. माय मरो पण मावशी जगो..! बरोबर ना फडणवीस साहेब,” असा टोला दानवे यांनी लगावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *