Headlines

फुले तोडताना विजेचा धक्का लागून वृद्धाचा मृत्यू:येवदा येथे गणेशोत्सवासाठी फुले आणताना घडली घटना, कुटुंबावर शोककळा




येवदा येथे गणेश चतुर्थी आणि हरतालिका सणाच्या उत्साहावर दुःखाची छाया पसरली आहे. सणासाठी पूजेची फुले आणि बेलपत्री आणण्यासाठी शेतात गेलेल्या रमेश बाळकृष्ण निर्मळे (वय ७०) यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे येवदा गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश निर्मळे हे रविवारी घरातून बाहेर पडले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला, पण ते सापडले नाहीत. सोमवारी सकाळी शेतकरी दीपक देशमुख हे त्यांच्या घोडचंडी रस्त्यावरील शेतात गेले. तिथे त्यांना रमेश निर्मळे यांचा मृतदेह दिसला. त्यांनी लगेच निर्मळे कुटुंबीयांना याची माहिती दिली. रमेश निर्मळे शेतात फुले तोडत असताना, त्यांना जिवंत वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का बसला असा प्राथमिक अंदाज आहे. वीजप्रवाह खूप तीव्र असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवला. रमेश निर्मळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. बातमी लिहेपर्यंत या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती. येवदा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *