Headlines

महाराष्ट्रात येऊन मराठीचा अपमान करू नका:दक्षिणेत जाऊन अशी भाषा कराल का? अमित शहांच्या विधानावर मनसे आक्रमक




महाराष्ट्रामध्ये काही लोक दुसरी भाषा शिकण्यास नकार देत असल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका कार्यक्रमात केले होते, तसेच पंतप्रधान मोदींमुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावर सडकून टीका करताना मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी थेट इशारा देत म्हटले आहे की, “महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी मराठीचा अपमान करू नये, महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. हवे तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या इतिहासाचे पुस्तक आम्ही अमित शाह यांना पाठवू.” गजानन काळे म्हणाले, महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शहा यांना पडला आहे. महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असे ते म्हणत आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शहा यांनी हिंदी भाषा संमेलनात येऊन करू नये, असे काळे यांनी म्हटले आहे. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शहा करू शकणार आहेत का? पुढे बोलताना गजानन काळे म्हणाले, एका बाजूला ते म्हणतात गुजरातमध्ये गुजराती बोलली जाते, हिंदी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन त्यांनी शहाणपणा सांगायचा? इथे हिंदी शिका? ज्याला कोणाला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे तो नक्की हिंदी शिकेल. हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवर आक्रमण महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान करणे हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. तामिळनाडू, आंध्र प्रदेशात किंवा दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शहा करू शकणार आहेत का? असा सवालही काळे यांनी उपस्थित केला आहे. अण्णा मलाई यांनी मध्यंतरी उदाहरण दिले होते की, हिंदी लादल्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये एका खासदाराच्यावर यश मिळाले नव्हते. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या इतिहासाचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे, याचा विसर त्यांना पडणार नाही, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *