![]()
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रियेला अखेर सुरुवात जाईल आहे. त्यानुसार 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत भारतीय पुरातत्व विभागाकडून पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या मूर्तीवर लेपन होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकाराई अधिकात्री श्रीकांत यादव यांनी दिली आहे. या मूर्ती सातत्याने झिजत असल्याने मंदिर समितीसह भाविकांनाही चिंता वाटत होती. त्यात भारतीय पुरातत्व विभागाकडून होणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला काही भाविकांनी विरोध करत न्यायालयात दाद मागीतल्याने जवळपास 3 महिन्यांपासून ही लेपन प्रक्रिया खोळंबली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने या रासायनिक प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवल्याने आता 22 सप्टेंबर रोजी शेज आरतीनंतर भारतीय पुरातत्व विभाग या कामला सुरुवात करणार असल्याची माहिती श्रीकांत यादव यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून भाविक पंढरीत येतात. तसेच भाविक विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेतात. सतत होणाऱ्या स्पर्शाने मूर्तीची झीज होते. मंदिर प्रशासनाच्या ताब्यात आल्यानंतर पहिले लेपन हे 1988 साली करण्यात आले होते. त्यानंतर थोड्या थोड्या कालावधीनंतर चार वेळेला मूर्तीवर लेपन लावण्यात आले होते. लेपनाची आवश्यकता पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांवर वर्षानुवर्षे लाखो भाविक नतमस्तक होतात आणि स्पर्श करतात. या सततच्या स्पर्शामुळे, तसेच देवावर होणारा अभिषेक, तापमानातील बदल आणि आर्द्रता यांसारख्या नैसर्गिक कारणांमुळे पाषाणाच्या मूर्तीची झीज होते. ही झीज आणखी वाढू नये, मूर्तीला गेलेले तडे भरून निघावेत आणि तिचे दीर्घकाळ संरक्षण व्हावे, यासाठी मूर्तीवर विशेष लेपन केले जाते. वज्रलेप आणि आधुनिक पद्धत परंपरेनुसार या संरक्षण प्रक्रियेला ‘वज्रलेप’ असे संबोधले जाते. मात्र, सद्यस्थितीत भारतीय पुरातत्त्व विभाग (ASI) मान्यताप्राप्त आधुनिक आणि रासायनिक संरक्षक लेपाचा वापर करण्याची शिफारस करतो. पुरातत्त्व विभागाचे निवृत्त उपसंचालक आणि रसायन तज्ज्ञ विलास पुनीराज यांच्या माहितीनुसार, या प्रक्रियेत इपॉक्सी राळ, दगडाची भुकटी आणि पाणी न झिरपणारे सिलिकॉन आधारित पदार्थ वापरले जातात. विशेष म्हणजे, पुरातत्त्व विभाग वापरत असलेली ही रसायने नैसर्गिक (हर्बल) आणि मान्यताप्राप्त आहेत. लेपनाचा टिकाऊपणा मूर्तीवर केलेल्या लेपनाचे आयुष्य मुख्यत्वे भाविकांचा स्पर्श, अभिषेकाचे प्रमाण आणि वातावरणातील बदल यावर अवलंबून असते. पंढरपूरमध्ये यापूर्वी करण्यात आलेले संरक्षणात्मक लेपन साधारण ५ ते ६ वर्षे चांगल्या स्थितीत टिकल्याचा अनुभव आहे. या कालावधीनंतर मूर्तीची पुन्हा झीज होऊ लागल्यास, त्यावर पुरातत्त्व विभागाच्याच मान्यताप्राप्त पद्धतीनुसार नव्याने लेपन करावे लागते. सद्यस्थिती आणि तातडीची उपाययोजना सध्या विठ्ठल मूर्तीच्या पायांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली असून तिथे एक खड्डा पडल्याचे निदर्शनास आले आहे. मूर्तीला इतर अनेक ठिकाणीही लेपनाची नितांत गरज असल्याने ही प्रक्रिया तातडीने राबवणे आवश्यक बनले होते. या पार्श्वभूमीवर, मंदिर समिती आणि प्रशासनाने भारतीय पुरातत्व विभागाच्या (ASI) सहकार्याने मूर्तीवर ही तातडीची रासायनिक लेपन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Source link
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर अखेर रासायनिक लेपनाला सुरुवात:उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा; पुरातत्व विभागाकडून होणार संवर्धन प्रक्रिया