![]()
३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना सोमवारी हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे झाली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुश्री चौधरी यांच्या हस्ते ही प्रतिष्ठापना संपन्न झाली. यावेळी येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली गणेश मूर्ती आवर्जून प्रतिष्ठापनेसाठी आणण्यात आली होती. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी यांनी पूजेचे पौराहित्य केले. हॉटेल सारस येथील हॉल या निमित्ताने सुशोभित करण्यात आला होता. कैद्यांनी केलेल्या गणेश मूर्तीची आवर्जून निवड कैदी बांधवांना गुन्हेगारीतून बाहेर काढून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान पुणे आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्षे ‘प्रेरणापथ’ हा प्रकल्प सुरू आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून या बंदींना जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि विराज खटावकर यांच्या मार्गदर्शनात गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 100 पेक्षा जास्त बंदी बांधवांनी 300 हून अधिक मुर्त्या बनवल्या. या प्रकल्पाला प्रतिसाद देऊन या बांधवांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी या प्रकल्पाला भेट दिली आणि पुणे फेस्टिवलसाठी एक मूर्ती घेतली. बंदींच्या सुधारणेच्या वाटचालीचा शुभारंभ पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून होतो आहे ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे असे कृष्णकुमार गोयल म्हणाले. या प्रकल्पाचे समन्वयक महाराष्ट्र कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके,पोलीस महानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक सुनील धमाळ, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ.मिलिंद भोई आणि आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप हे आहेत. या कार्यक्रमाला पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अॅड. अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, रमेश बागवे, सुनील शिंदे, अबेदा इनामदार, आय. पी. इनामदार, काका धर्मावत, राजू साठे, अतुल गोंजारी, द.स.पोळेकर, बाळासाहेब अमराळे, सुप्रिया ताम्हाणे, अॅड. अनुराधा भारती, अशोक मेमजादे, डॉ. रवी चौधरी, कर्ना उपाध्याय, आबा जगताप, संयोगिता कुदळे, तेजश्री अडिगे, नावेद अत्तार उपस्थित होते. याशिवाय विनोद सुर्वे, नामदेव चाळके, सचिन खवले, विजय शेटे आणि एन. आय. ई. एम. चे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना:38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये पीएमआरडीए आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते पूजा