Headlines

हिंगोली पालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा:विजेत्यांना दिली जाणार पारितोषीके, हिंगोली पालिकेचा निर्णय




हिंगोली पालिकेच्या वतीने पर्यावरणपुरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत शहरातील नागरीकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषीके दिली जाणार आहेत. पर्यावरणपुरक गणेशोत्सव स्वच्छ हिंगोली उपक्रमांतर्गत हि स्पर्धा घेतली जात असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. हिंगोली नगर परिषदेच्या वतीने शहरात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे हा या स्पर्धेचा उद्देश असून याद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. या स्पर्धेत केवळ हिंगोली शहरातील नागरिक आणि कुटुंबेच सहभागी होऊ शकतील. गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, यासाठी गणेशमूर्ती पर्यावरणपूरक, नैसर्गिक व शाश्वत साधनांपासून तयार केलेली असावी आणि तिला नैसर्गिक रंगांचाच वापर केलेला असावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. या स्पर्धेत सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. या शिवाय निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करणे बंधनकारक आहे. मूर्ती विसर्जनासाठी घरगुती विसर्जन किंवा नगरपरिषदेच्या कृत्रिम विसर्जन तलावाचा वापर करणे अपेक्षीत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी त्यांच्याकडील पर्यावरणपूरक गणेशोत्सावाची छायाचित्रे व आवश्यक माहिती निर्धारीत पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे परीक्षण समितीमार्फत स्पर्धकांचे गुणांकन केले जाईल. स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून त्यासाठी १४ ते १८ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये विजेत्या ठरणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट किंवा उपक्रमांना आकर्षक रोख बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव – स्वच्छ व सुंदर हिंगोली या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेखाताई श्रीरामदादा बांगर, उपनगराध्यक्ष अ. माबुद बागवान, मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *