![]()
‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषाने बुधवारी शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्हा अक्षरशः दुमदुमून गेला. गणेश चतुर्थीच्या मंगलमुहूर्तावर लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले आणि चैतन्याच्या जल्लोष पर्वाला सुरुवात झाली. सकाळपासून शहराच्या विविध भागांत बाप्पांच्या स्वागतासाठी निघालेल्या मिरवणुका, ढोल-ताशांचा निनाद, भगवे फेटे-उपरण्यांनी सजलेले गणेशभक्त आणि सजवलेल्या वाहनांमुळे साताऱ्याच्या रस्त्यांवर उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात तब्बल २ लाख ३९ हजार ४२२ घरगुती गणेशमूर्ती, तर ५ हजार २७६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ५७४ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना स्वीकारली आहे. त्यामुळे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र गणेशोत्सवाचा एकच सूर ऐकू येत होता. घरातील गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची लगबग सुरू होती. पूजेचे साहित्य, फुले, हार, दूर्वा, केवडा, सजावटीचे साहित्य यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. अनेक कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून बाप्पांची प्रतिष्ठापना केली. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पांच्या आगमनाचा आनंद स्पष्ट दिसत होता. सार्वजनिक मंडळांनीही आपल्या लाडक्या गणरायाला वाजतगाजत आणले. बहुतांश मंडळांनी यंदा पारंपरिक ढोल-ताशा पथकांना प्राधान्य दिल्याने मिरवणुकांमध्ये भक्ती आणि उत्साहाचा संगम दिसून आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, भगवे फेटे, उपरणे आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले. सम्राट गणेश मंडळ, श्रीमंत महागणपती, प्रकाश मंडळ, सोन्या मारुती मंडळ, शिवाजी सर्कल, प्रताप मंडळ, मंडईचा राजा, केसरकर पेठेचा राजा यांसह विविध मंडळांमध्ये विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. चौका-चौकात उभारलेल्या स्वागत कमानी आणि आकर्षक सजावटींनी शहराच्या सौंदर्यात भर पडली. बाप्पांच्या स्वागतासाठी निघालेल्या मिरवणुकांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दीचा ताण जाणवत होता. अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली. मूर्तींचा वीजवाहक तारांना स्पर्श होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना लांब काठ्यांच्या साहाय्याने तारांचा मार्ग मोकळा करावा लागत होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी प्रमुख चौक आणि मिरवणूक मार्गांवर बंदोबस्त तैनात केला होता. गणरायाच्या आगमनानंतर आता गौरी आगमनाची चाहूल लागली असून, पुढील काही दिवस बाजारपेठांमध्ये पुन्हा खरेदीची लगबग वाढणार आहे. गणेशोत्सवाच्या या मंगल पर्वामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात भक्ती, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून पुढील दहा दिवस शाहूनगरी गणेशमय राहणार आहे. राजवाडा ते पोवईनाक्यापर्यंत रस्ते गजबजले गणरायाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर पडल्याने बुधवारी सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. राजवाडा, मोती चौक, पोवईनाका, शाहूपुरी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर तसेच प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी वर्दळ होती. गणेशमूर्ती घेऊन जाणारी वाहने, मिरवणुका आणि खरेदीसाठी आलेले नागरिक यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला. पोलीस मामांची जबाबदारी वाढली मिरवणुका, वाहतूक आणि सुरक्षेचा तिहेरी ताण सातारा जिल्हा पोलिसांवर वाढला आहे. गणेशोत्सवाच्या प्रारंभाबरोबरच शहरातील पोलिसांची जबाबदारीही वाढली आहे. मिरवणूक मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच गर्दीचे नियमन, महिला व बालकांची सुरक्षा आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्रमुख चौकांसह संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पुढील दहा दिवस उत्सव काळात पोलिस यंत्रणेला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. आता गौरी आगमनाचे वेध.. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर आता महिलांसह कुटुंबीयांना गौरी आगमनाचे वेध लागले आहेत. गौरीच्या सजावटीपासून पूजेच्या साहित्यापर्यंतची तयारी घराघरांत सुरू झाली आहे. गौरीसाठी लागणारे मुखवटे, वस्त्र, दागिने, सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी येत्या दोन दिवसांत बाजारपेठेत आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. गौरी-गणपतीनिमित्त दागिन्यांच्या खरेदीला उधाण गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. गौरीसाठी पारंपरिक दागिने, नथ, बांगड्या, मंगळसूत्रातील नवीन डिझाईन्स तसेच सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या खरेदीला महत्त्व असल्याने सराफ बाजारात ग्राहकांची पावले वळू लागली आहेत. मोदक, पेढे अन् श्रीखंडाला मागणी; सणासुदीच्या खरेदीला वेग गणरायाच्या स्वागताबरोबरच मिठाईच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी वाढली. मोदक, पेढे, श्रीखंड, बासुंदी आणि विविध प्रकारच्या मिठाईंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये रांगा लावल्या. घरगुती पूजेसाठी तसेच नातेवाईक-मित्रांना प्रसाद देण्यासाठी मिठाईची मागणी वाढली असून गणेशोत्सवामुळे मिठाई विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळाली आहे.
Source link
चैतन्याच्या जल्लोषात शाहूनगरीत बाप्पांचे आगमन!:घरोघरी मंगलमूर्ती विराजमान; ढोल-ताशांच्या गजराने सातारा दुमदुमला, गणेशभक्तीला उधाण