![]()
पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची श्री गणेश सुवर्णधाम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची विधीवत स्थापना झाली. याआधी बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशा पथकांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची उधळण करण्यात आली. तसेच, बुधवार चौकात सात थर रचून बाप्पाचे जंगी स्वागत करण्यात आले. या आगमन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. दरवर्षीच्या परंपरेनुसार, सकाळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन या दांपत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर आढाव बंधूंनी नगारा वादन केले. आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांनी सजवलेल्या पारंपरिक रथात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी रंगारी भवन परिसरात भक्तीमय वातावरण होते. रंगारी भवनापासून सुरू झालेली ही मिरवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक आणि बाजीराव रस्त्यावरून दिमाखात निघाली. श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधिनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ आणि शंखनाद यांसारख्या प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांनी मिरवणुकीत आपले अप्रतिम वादन सादर केले. मिरवणूक बुधवार चौकात पोहोचताच कसबा, पुणे दहीहंडी संघाच्या गोविंदांनी मानवी मनोरे रचून बाप्पाला मानवंदना दिली. यानंतर कार्यकर्त्यांनी आणि भक्तांनी हवेत सप्तरंगांची उधळण केली. ढोलांच्या तालावर नाचणारे तरुण-तरुणी, हवेतील विविधरंगी गुलाल आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण बुधवार चौक दुमदुमून गेला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास मिरवणूक श्री गणेश सुवर्णधाम मंदिरासमोर पोहोचली. त्यानंतर बाप्पांची मूर्ती सुंदर आणि सुशोभित मखरात विराजमान करण्यात आली. प्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरतीचा लाभ घेतला. त्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सचिव स्वामी गोविंदगिरी महाराज आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही श्री गणेश सुवर्णधाम मंदिरात येऊन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
Source link
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना:श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती श्री गणेश सुवर्णधाम मंदिरात विराजमान; मिरवणुकीत सप्तरंगांची उधळण अन् सात थरांनी स्वागत