![]()
राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘डबल इंजिन’चे सरकार पूर्णपणे फेल झाले आहे. महाराष्ट्रात एवढा मोठा दुष्काळ पडलेला असतानाही फडणवीस सरकारला अद्याप जाग आलेली नाही,” असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, विरोधक या प्रश्नावर राजकारण करत असल्याच्या भाजपच्या आरोपांचाही त्यांनी समाचार घेतला. मदतीच्या दाव्यांवरून राज्य सरकारला घेरले शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीवरून राज्य सरकारच्या दाव्यांवर नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “केंद्र सरकारचे नियम वेगळेच काहीतरी सांगतात आणि इकडे राज्यातील सरकार मात्र थापा मारत आहे. आम्ही NDRF (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) च्या निकषांपेक्षाही जास्त पैसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देतो, अशा वल्गना राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. राज्यात एवढ्या भयंकर दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत असतानाही या सरकारला जाग का येत नाही?” “सरकारला दुष्काळातही राजकारण दिसते” दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, आम्ही या प्रक्रियेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, असे पटोले म्हणाले. मात्र, यावर भाजपकडून सातत्याने अशी टीका केली जात आहे की, विरोधक दुष्काळाच्या नावाखाली स्वतःच्या ‘राजकीय पोळ्या’ शेकत आहेत. भाजपच्या या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देताना पटोले संतापून म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर प्रशासनाला जागे करण्यासाठी काम करत आहोत. पण आता अशा भीषण दुष्काळामध्येही सत्ताधारी भाजप आणि सरकारला फक्त राजकारणच दिसत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.” सत्ताधाऱ्यांच्या या असंवेदनशील भूमिकेमुळे राज्यातील शेतकरी आणखीच भरडला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. थातूरमातूर नाही, शेतकऱ्यांना ठोस मदत देणार!:7-8 दिवसांत दुष्काळाचा अंतिम अहवाल; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपुरात घोषणा राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना थातूरमातूर मदत न करता भविष्यात भक्कम आधार मिळेल अशी सर्वंकष उपाययोजना राज्य सरकार करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाच्या विषयाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, प्रशासनाला थेट बांधावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 7 ते 8 दिवसांत दुष्काळाचा सविस्तर अहवाल येईल आणि त्या आधारे केंद्र व राज्य सरकारकडून मदतीचा ठोस निर्णय घेतला जाईल. याशिवाय ‘महाखनिज 2.0’ धोरण, शक्तिपीठ महामार्ग, आजारी बालिकेचा उपचार आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळातही सरकारला राजकारण दिसतंय का?:फडणवीस सरकारला जाग का येत नाही? नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात