![]()
अमरावती-परतवाडा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव सध्या धोक्यात आहे. ब्रिटिशकालीन शेकडो जुनी झाडे जीर्ण झाली असून, ती कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘परतवाडा-अमरावती रस्ता विकास कृती समिती’ने आता जनचळवळ उभारण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटिश काळात मुख्यतः बैलगाड्या आणि कमी वाहतूक लक्षात घेऊन हा रस्ता तयार करण्यात आला होता. प्रवाशांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दुतर्फा निंबाची झाडे लावण्यात आली होती. आता ७० ते ८० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्ता अरुंद पडत आहे आणि वयामुळे ही झाडे आतून कुजली आहेत. किंचित वादळी वारा किंवा पावसात ही झाडे थेट चालत्या वाहनांवर कोसळण्याचा धोका आहे. यामुळे जीवघेणे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाने परतवाडा-अमरावती मार्गाचे त्वरित रुंदीकरण व विकास करणे गरजेचे आहे, असे समितीने म्हटले आहे. विकासकामांदरम्यान धोकादायक झाडे हटवून नवीन झाडे लावल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि प्रवास सुरक्षित होईल, असा पर्याय कृती समितीने दिला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि रस्त्याच्या विकासासाठी ‘परतवाडा-अमरावती रस्ता विकास कृती समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, झाडे उन्मळून पडून नागरिकांचा बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
Source link
परतवाडा-अमरावती महामार्गावरील जीर्ण झाडांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात:कधीही कोसळून अपघात होण्याची भीती, रस्ता विकास कृती समिती सक्रिय