Headlines

IIT मुंबई आत्महत्या प्रकरण:जातीयवादी अपशब्द वापरत तीन महिने मानसिक छळ केल्याचा साहिलच्या वडिलांचा आरोप, प्राध्यापकाविरोधात FIR दाखल




आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डल्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. साहिलच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत प्राध्यापकांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून प्राध्यापकांनी आपल्या मुलाचा छळ करत त्याला जातीयवादी अपशब्द वापरले, असा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीत आयआयटी मुंबईचे संचालक श्रीशिष बी. केदारे यांच्यासह अनेक प्राध्यापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे देण्यात आली असून, संचालकांच्याच सांगण्यावरून साहिलचा छळ झाल्याचा दावा वडिलांनी केला आहे. साहिल (वय 22) हा ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. 18 सप्टेंबर रोजी वसतिगृह क्रमांक 4 मधील त्याच्या खोलीत तो मृतावस्थेत आढळला. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. दुसरीकडे, आयआयटी प्रशासनाने असा दावा केला आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी साहिल परीक्षेदरम्यान चॅटजीपीटीच्या मदतीने मोबाईलवर उत्तरे शोधताना पकडला गेला होता. त्यानंतर त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न करता विभागप्रमुख आणि प्रशिक्षकांनी त्याचे समुपदेशन केले. तसेच, त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासनही त्याला देण्यात आले होते. मात्र, दुपारी 4 वाजता वसतिगृहात परतल्यानंतर रात्री उशिरा त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. आयआयटीतील आत्महत्यांचे सत्र साहिलच्या मृत्यूमुळे आयआयटीसारख्या देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयआयटी मुंबईत गेल्या अवघ्या सात महिन्यांत घडलेली ही तिसरी आत्महत्येची घटना आहे. तसेच, या चालू वर्षात देशभरातील विविध आयआयटी संस्थांमध्ये मिळून तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धक्कादायक आकडेवारी आणि शैक्षणिक तणाव ग्लोबल आयआयटी माजी विद्यार्थी सहाय्यता गटाच्या (Global IIT Alumni Support Group) अहवालानुसार, गेल्या 20 वर्षांत 160 आयआयटी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून, यातील 43 टक्के घटना केवळ गेल्या पाच वर्षांतील आहेत. 2025 मध्ये सर्वाधिक 16 आत्महत्यांची नोंद झाली होती, तर 2026 मध्ये सप्टेंबरपर्यंत नऊ जणांनी आपला जीव दिला आहे. एका सर्वेक्षणानुसार, दहापैकी सहापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ‘शैक्षणिक तणाव’ हेच आत्महत्येचे सर्वात मोठे कारण असल्याचे म्हटले असून, बहुतांश आत्महत्या या परीक्षेच्या काळातच घडत असल्याचे या गटाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची निष्पक्ष चौकशी करा; मनविसे आक्रमक भारतातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई’ (आयआयटी मुंबई ) मधील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागील सत्य समोर आलेच पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) शिष्टमंडळाने आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाला घेराव घालून जाब विचारला. मागील वर्षभरात रोहित सिन्हा (22), नमन अग्रवाल (21), सोहिल सांगवान (20) आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असलेला साहिल वाकोडे (19) या चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. उच्च शिक्षणाचे स्वप्न घेऊन संस्थेत आलेल्या या तरुण विद्यार्थ्यांना टोकाचे पाऊल का उचलावे लागले? या प्रश्नाचे उत्तर अजूनही अस्पष्ट आहे. या गंभीर विषयावर मनविसेच्या शिष्टमंडळाने आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. सुरेश केदारे, उपसंचालक डॉ. रवींद्र गुड्डी आणि सचिव डॉ. भावे यांची भेट घेऊन उत्तर मागितले. मात्र, प्रशासनाकडून अत्यंत मोघम आणि असमाधानकारक उत्तरे मिळाल्याचा आरोप मनविसेने केला आहे. ही केवळ चार कुटुंबांची शोकांतिका नसून देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेपुढील गंभीर प्रश्न आहे, असे मत मनविसेने व्यक्त केले. मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार या सर्व घटनांचा तथ्याधारित आणि कायदेशीर मार्गाने पाठपुरावा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांना सुरक्षित, संवेदनशील आणि मानसिक आधार देणारे वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मनविसे राज्य सरचिटणीस ॲड. संतोष गांगुर्डे यांनी केले. या आंदोलनात आणि शिष्टमंडळात सरचिटणीस संतोष गांगुर्डे, सचिव प्रमोद मांढरे, सचिव नितीन ननावरे, उपाध्यक्ष प्रशांत परुळेकर, उपविभाग अध्यक्ष गोविंद जोईल, शाखा सचिव राहुल कदम, विद्यार्थी संघटक वैभव देवकर, उपशाखाध्यक्ष प्रवीण नाडर आणि आकाश सोनवणे सहभागी झाले होते. मनविसेने सर्व मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *