Headlines

अल्झायमर मेंदूच्या पेशींवर परिणाम करणारा गंभीर आजार:स्मरणशक्तीतील बदल 'म्हातारचळ' नसून वेळीच निदान महत्त्वाचे, डॉक्टरांचे आवाहन




अल्झायमर हा मेंदूच्या पेशींवर हळूहळू परिणाम करणारा आजार आहे. यामुळे स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, वर्तन आणि दैनंदिन कामांवर परिणाम होतो. डिमेंशियाच्या एकूण रुग्णांपैकी 60 ते 70 टक्के रुग्णांना अल्झायमर असतो. वाढत्या सरासरी आयुष्यामुळे आणि वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे भविष्यात या आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आजाराबद्दल जनजागृती करणे आणि वेळेवर निदान करणे खूप महत्त्वाचे आहे. वय वाढल्यावर काही गोष्टी विसरणे सामान्य असू शकते. पण, वारंवार एकाच गोष्टी विचारणे, नेहमीच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग विसरणे, रोजची कामे करण्यात अडचण येणे, पैशांचे व्यवहार किंवा औषधांचे वेळापत्रक सांभाळता न येणे, जवळच्या लोकांना ओळखण्यात अडचण येणे किंवा व्यक्तिमत्त्व व वर्तनात मोठे बदल होणे, ही अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील डॉ. श्रीकांत देशमुख यांनी अल्झायमर दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा साध्या विस्मरणासारखी वाटतात. त्यामुळे रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय त्याकडे दुर्लक्ष करतात. पण, स्मरणशक्तीतील बदल दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतील, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. वेळेवर तज्ज्ञांकडून तपासणी केल्यास आजाराचे स्वरूप समजून घेता येते. यामुळे उपलब्ध उपचारांच्या मदतीने रुग्णाची कार्यक्षमता आणि जीवनमान अधिक काळ चांगले ठेवता येते. डॉ. जयपाल घुनावत म्हणाले, अल्झायमरचे निदान फक्त विस्मरणाच्या एका लक्षणावर केले जात नाही. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, स्मरणशक्ती आणि इतर बौद्धिक क्षमतांची तपासणी, आवश्यक रक्त तपासण्या आणि गरजेनुसार मेंदूच्या इमेजिंग तपासण्या यांचा विचार केला जातो. काही वेळा स्मरणशक्ती कमी होण्यामागे इतर उपचार करता येण्याजोगी कारणेही असू शकतात. त्यामुळे स्वतःहून कोणताही निष्कर्ष न काढता तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मेडिकोव्हर हॉस्पिटल्सचे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी सांगितले की, अल्झायमर हा केवळ विस्मरणाचा आजार नाही. तो रुग्णाच्या संपूर्ण जीवनावर आणि कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो. त्यामुळे स्मरणशक्ती किंवा वर्तनातील मोठ्या बदलांकडे ‘वयाचा परिणाम’ किंवा ‘म्हातारचळ’ म्हणून दुर्लक्ष करू नये. वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला, योग्य निदान, उपलब्ध उपचार आणि कुटुंबीयांचा आधार यामुळे रुग्णाचे जीवन अधिक सुरक्षित आणि सोपे करता येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *