Headlines

दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल:‘शक्तिपीठासाठी 80 हजार कोटी, मग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नाहीत का?’




महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी 80 हजार कोटी आणि कुंभमेळ्यासाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाते, मग शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके सुकत आहेत. सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्ष मदतीसाठी आणखी किती वेळ लागणार, असा सवाल त्यांनी केला. ‘शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या’ दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तसेच सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काँग्रेसकडून आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. मंत्र्यांना महाराष्ट्रभर फिरू देणार नाही, असा सत्याग्रहाचा इशारा सपकाळ यांनी दिला. ‘लाज विकून खाल्ली आहे’ कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान काही अधिकारी झोपलेले, तर काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेवरूनही सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी गंभीर संकटात असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली. ‘लाज विकून खाल्ली आहे’ हा शब्दप्रयोग सरकारला 100 टक्के लागू होतो, असे सपकाळ म्हणाले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी विमान पकडण्याची घाई कृषिमंत्र्यांना असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार मूक-बधिर आणि आंधळेच नाही, तर बेशरम झाले असल्याची तीव्र टीका सपकाळ यांनी केली. ‘अधिकाऱ्यांची पाठराखण केली जात आहे’ दौऱ्यादरम्यान झोपलेल्या किंवा मोबाईलवर व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. कृषिमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा दावा त्यांनी केला. काही खासदारांकडून काजू-बदाम खाण्याच्या प्रकाराचे समर्थन केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकरी संकटात असताना सत्ताधारी आणि प्रशासनातील जबाबदार व्यक्तींचे हे वर्तन संतापजनक असल्याचे सपकाळ यांनी म्हटले. आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा, ओबीसी, व्हीजेएनटी आणि आदिवासी समाजांमध्ये सामाजिक दरी निर्माण होत असल्याचा मुद्दाही सपकाळ यांनी उपस्थित केला. विविध समाजांमध्ये भांडणे लावून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरक्षणाकडे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे सांगताना त्यांनी विनोबा भावे यांच्या संस्कृतीच्या व्याख्येचा दाखला दिला. स्वतःच्या ताटातील अन्न खाणे ही स्वप्रकृती, दुसऱ्याचे हिसकावून खाणे ही विकृती आणि आपल्या ताटातील भाकर वाटून खाणे ही संस्कृती असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘राहुल गांधींवर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या’ देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेवरही हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींवर टीका करण्यापेक्षा फडणवीस यांनी विद्यार्थी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, असे सपकाळ म्हणाले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रत्यक्ष मदत देण्याची गरज आहे. सध्या राज्यातील शेतकरी संकटात असताना सरकारने राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, दुष्काळ, शेतकरी मदत, कर्जमाफी, आरक्षण आणि सरकारच्या कारभारावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. हेही वाचा…. डीजेच्या दणदणाटाची मुंबई हायकोर्टाकडून सुमोटो दखल:नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश, उद्या तातडीची सुनावणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या ध्वनीप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्वतःहून दखल घेतली. उत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेसह ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. याप्रकरणी जनहित याचिका दाखल करत राज्य सरकारकडून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *