![]()
अमरावती येथे सोमवारी पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांना अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे नागरिकांची कामे कशी रखडतात, याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांच्या सूचनेनुसार नियोजन भवनात हा जनता दरबार भरवण्यात आला होता. या दरबारात तक्रारदारांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ पालकमंत्र्यांनाही कामकाज थांबवावे लागले. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणल्यानंतर दरबारचे काम पुन्हा सुरु झाले. पालकमंत्री कार्यालयाच्या मोजणीनुसार, जनता दरबारात एक हजारहून अधिक तक्रारी आल्या होत्या. पालकमंत्र्यांनी या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. नागरिकांनी अशा अनेक तक्रारी मांडल्या. यात तहसीलदारांनी पैसे मागितल्यापासून, नगरसेवकाने अतिक्रमण केल्यापर्यंत, कोणार्क कंपनीने कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्यापासून, भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी न करण्यापर्यंतचे मुद्दे होते. तसेच घरकुलाची रक्कम न मिळणे, वीज पुरवठा अनियमित असणे, डीबी उघड्या पडणे, स्वस्त धान्य दुकानातून रेशन न मिळणे, अभ्यासिका नसणे, अधिकारी उपलब्ध न होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, कर्जमाफीच्या रकमेतून कपात होणे, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त होणे, जमिनीचा ताबा मिळूनही मालकी हक्क न मिळणे, रस्त्याशेजारील नाले दुरुस्ती अडकणे आणि योजनांचा लाभ न मिळणे यासारख्या अनेक समस्यांचा समावेश होता. पालकमंत्री प्रत्येक तक्रारीवर यंत्रणेला निर्देश देत होते. जनता दरबारातील तक्रारी ऐकल्यानंतर पालकमंत्र्यांनी बँका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी आमदार प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रतापदादा अडसड, प्रवीण पोटे, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जि.प. चे सीईओ सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, एसडीओ अनिल भटकर आणि उपजिल्हाधिकारी विवेक जाधव उपस्थित होते. जनता दरबार सुरु असताना दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात आणि सामान्य नागरिकांना घरात वारंवार अनुभवला येणारे अघोषित भारनियमन आज पालकमंत्र्यांनाही अनुभवायला मिळाले. मात्र, यंत्रणेने तात्काळ धावपळ करून पर्यायी व्यवस्था केली. सामूहिक असो वा वैयक्तिक, सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यांना पत्र पाठवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. अनेक नागरिक तक्रार ऐकवल्यानंतर पोच मागत होते. मात्र, येथे पोच देता येणार नाही, तुमचे काम मात्र होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Source link
अधिकाऱ्यांकडून अडवणूक, त्रस्त नागरिक पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात:1000 हून अधिक तक्रारींची सुनावणी, काहींचे समाधान तर काही नागरिक नाराज