Headlines

एडीसीसी बँकेच्या निवडणूक यादीत 2825 मतदार:प्रारुप यादी जाहीर; 30 सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना मागवल्या




अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) निवडणूक यादीत २ हजार ८२५ मतदारांचा समावेश आहे. सोमवारी (२१ सप्टेंबर) या सर्व मतदारांच्या नावांची प्रारुप यादी जाहीर करण्यात आली. या यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेच्या २० सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ पुढील महिन्यात ४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक वेळेवर होणार नसली तरी, प्रक्रिया सुरू झाल्याने ती काही विलंबाने होईल, हे निश्चित झाले आहे. हरकती आणि सूचनांवर निर्णय घेतल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. गेल्या अडीच वर्षांपासून बँकेच्या सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि पुन्हा मिळवण्यासाठी सत्ताधारी बच्चू कडू-अभिजीत ढेपे गट आणि विरोधी काँग्रेस गटात मोठी चुरस पाहायला मिळेल. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करणे आणि मतदानाच्या तारखा घोषित होतील. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकूण मतदारांमध्ये सर्वाधिक ७०७ मतदार अमरावती तालुक्यात आहेत. याशिवाय चांदूर बाजारमध्ये ३७८, अचलपूरमध्ये ३२९, दर्यापूरमध्ये २८२, वरुडमध्ये २२६, मोर्शीत २२५, अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८७, नांदगाव खंडेश्वरमध्ये १७१, तिवस्यात ८२, धामणगाव रेल्वे तालुक्यात ७२, भातकुलीत ६४, चांदूर रेल्वे तालुक्यात ५०, धारणीत २८ आणि चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी २४ मतदार नोंदवले गेले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *