![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांवरील पुलांचे संरक्षक कठडे आणि लोखंडी पाईप अतिवृष्टीत वाहून गेले आहेत. दीड महिना उलटूनही त्यांची दुरुस्ती झालेली नाही. यामुळे या धोकादायक पुलांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. फुबगाव-वाघोडा, बेलोरा-धामक, पहूर-नांदगाव, धानोरा फशी-शेलुगुंड, सालोड-शिवरा, कोदोरी-वाघोली तसेच जावरा-मोळवण परिसरातील पुलांवर संरक्षण कठडे व लोखंडी पाईप नाहीत. या मार्गांवरून विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, दुचाकीस्वार, शालेय वाहने आणि खासगी वाहनांची मोठी वर्दळ असते. कठडे नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी पुलाची सीमा लक्षात येत नाही. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होते. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यास वाहन नदी किंवा नाल्यात कोसळण्याची भीती आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा हा गंभीर प्रश्न आहे. यापूर्वीही काही अपघात झाले आहेत, तरीही प्रशासनाने ठोस उपाययोजना केली नाही. आणखी किती अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तालुक्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न जुना आहे. दोन वर्षांपूर्वी जावरा पुलावरून पाण्याचा जोर वाढला असताना ट्रॅक्टरसह एक व्यक्ती वाहून गेली होती. तसेच गोधडी येथील पुलावरून एका शाळकरी मुलाला पाण्याच्या प्रवाहात वाहून जावे लागले होते. गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कठडे वाहून गेल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्तीला वेळ लागणार असेल, तर किमान तात्पुरते बॅरिकेडिंग किंवा धोक्याचे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी अशी प्राथमिक खबरदारीही घेतली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पुढचा अपघात होण्यापूर्वी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Source link
नांदगाव खंडेश्वरमध्ये पुलांचे संरक्षक कठडे गायब; नागरिकांचा जीव धोक्यात:अतिवृष्टीला दीड महिना उलटूनही दुरुस्ती नाही, प्रशासनाचे दुर्लक्ष