Headlines

डीजेच्या दणदणाटाची मुंबई हायकोर्टाकडून सुमोटो दखल:नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश, उद्या तातडीची सुनावणी




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या ध्वनीप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्वतःहून दखल घेतली. उत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेसह ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. याप्रकरणी जनहित याचिका दाखल करत राज्य सरकारकडून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने सोमवारी दैनंदिन कामकाज सुरू होण्यापूर्वी राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांना न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानंतर झालेल्या सुनावणीदरम्यान गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणुकांमध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला. ‘सणांना विरोध नाही, पण इतरांना त्रास होता कामा नये’ सण आणि धार्मिक उत्सव साजरे करण्याला न्यायालयाचा विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, उत्सव साजरा करताना त्याचा त्रास इतर नागरिकांना होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. गणेशोत्सवातील विशेषतः विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषणाची निर्धारित मर्यादा पाळली जात आहे का, याची माहिती न्यायालयाने मागितली. आवाजाची मर्यादा निश्चित करण्यासाठी कोणती नियमावली आहे, तिची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी केली जात आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जात आहे, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. गेल्या वर्षीच्या कारवाईचाही तपशील द्यावा लागणार न्यायालयाने केवळ यंदाच्या गणेशोत्सवातील परिस्थितीचा अहवाल मागितलेला नाही. गेल्या वर्षी ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात किती कारवाई झाली, कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आणि यंदाच्या वर्षी आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याची तुलनात्मक माहितीही सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील तातडीची सुनावणी मंगळवारी, 22 सप्टेंबरला होणार आहे. नागपूर-विदर्भात डीजेवर कठोर निर्बंध दरम्यान, ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर नागपूर आणि विदर्भातही न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. नागपूर खंडपीठाने नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या डीजेवर १ नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी केवळ आदेश किंवा अधिसूचनेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात तिची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात डीजे मिक्सर, अॅम्प्लीफायर आणि संपूर्ण साउंड सिस्टीम जप्त करण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ध्वनीप्रदूषणाचे नियम आणि डीजेबाबतचे निर्बंध केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून वर्षभर होणाऱ्या विविध धर्मांच्या सार्वजनिक उत्सव आणि मिरवणुकांनाही लागू असल्याचे यापूर्वी न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अहिल्यानगरमध्येही नियमभंगाविरोधात कारवाईचा इशारा अहिल्यानगरमध्येही डीजेच्या वापरावरून वाद सुरू आहे. डीजेवरील निर्बंध हटवण्याच्या मागणीसाठी व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असताना, जिल्ह्यात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी न्यायालयाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेवगाव येथील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात साउंड सिस्टीमचा वापर करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर, कार्यक्रमात निर्धारित आवाजाची मर्यादा ओलांडली असल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. पुण्यातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दाही चर्चेत गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील विद्यानंद बापट यांनी सण-उत्सवांदरम्यान होणारे ध्वनीप्रदूषण आणि रहदारीला होणारा अडथळा हे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या भूमिकेला नागरिकांकडून समर्थन मिळाले असून, त्यांच्या समर्थनार्थ पुण्यात मोर्चाही काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून ध्वनीप्रदूषणाची दखल घेतल्याने राज्यातील गणेशोत्सव आणि आगामी विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषणाचे नियम कितपत पाळले जातात, तसेच नियम मोडणाऱ्यांवर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… IIT मुंबईच्या काही विद्यार्थ्यांचा प्राध्यापक सूर्या नारायण डुल्ला यांना पाठिंबा:750 प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व करणारे फोरमही पाठीशी
आयआयटी मुंबई येथील एका द्वितीय वर्षाच्या बीटेक विद्यार्थ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या माजी विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे, सुमारे 750 प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘आयआयटी बॉम्बे फॅकल्टी फोरम’नेही सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करत डुल्ला यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *