Headlines

रवींद्र धंगेकरांनी संतोष पंडित यांचा केला सत्कार:जामिनानंतर समर्थन करत म्हणाले, ‘एखाद्या गुंडाप्रमाणे रात्री अटक केली’, पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल




पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांना जामीन मिळाल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कार केला. धंगेकर यांनी पंडित यांच्या डोक्यावर फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. या सत्कारानंतर धंगेकर यांनी संतोष पंडित यांच्या अटकेवर आणि पोलिसांच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं प्रकरण काय आहे संतोष पंडित हे पुण्यातील नागरी प्रश्न आणि विकासकामांबाबत सोशल मीडियावरून व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत होते. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाची टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या प्रकरणी एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून 3 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर संतोष पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. काही दिवसांनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे नमूद केले असून, तक्रारदाराशी संपर्क न साधणे आणि पुराव्यांमध्ये छेडछाड न करणे अशा अटी घातल्या आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर संतोष पंडित यांनी सामाजिक प्रश्नांवर काम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भविष्यात अपशब्दांचा वापर टाळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रवींद्र धंगेकर यांनी पंडित यांचा केला सत्कार दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी पंडित यांचा सत्कार करत त्यांच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केला. “संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती. संतोष पंडित यांना माझे समर्थन आहे. पोलीस नेमकं कुणासाठी काम करत आहेत?”, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांच्या कारवाईवर टीका करताना धंगेकर म्हणाले की, “कलियुगाची सुरुवात आता कोथरूडपासून झाली आहे. दादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठरवून केले जात आहेत. हिटलरशाही आणि हुकूमशाही फार काळ टिकणार नाही. एखाद्या गुंडाप्रमाणे संतोष पंडित यांना रात्री अटक केली. पुणे पोलिसांची भूमिका पारदर्शक नाही.” हे रवींद्र धंगेकरांचे आरोप आहेत. धंगेकर यांनी संतोष पंडित यांच्या समर्थनाची भूमिका घेतल्याने या सत्काराची राजकीय चर्चाही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे रवींद्र धंगेकर हे शिंदे गटातील नेते असून चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे यापूर्वीही राजकीय मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यामुळे पंडित यांचा सत्कार आणि त्यानंतर धंगेकरांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, संतोष पंडित यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा हा केवळ राजकीय टीकेपुरता मर्यादित नसून, तक्रारीनुसार कथित आक्षेपार्ह व्हिडीओ आणि महिलेशी संबंधित आरोपांवरही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची कारवाई, न्यायालयीन प्रक्रिया आणि त्यावर होत असलेली राजकीय वक्तव्ये हे तीन वेगवेगळे मुद्दे आहेत. हेही वाचा… धाराशिवमध्ये मुलासमोर पती-पत्नीमध्ये रक्तरंजित हाणामारी:एकमेकांवर धारदार शस्त्राने वार, पत्नीचा जागीच मृत्यू
पती-पत्नीमधील किरकोळ वाद काही वेळातच टोकाला गेल्याने घरातच रक्तरंजित घटना घडली. दोघांनीही एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील लोहारा परिसरात घडली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. आप्पाराव राठोड आणि कमलाबाई राठोड अशी या दाम्पत्याची नावे आहेत. जखमी आप्पाराव यांच्यावर लोहारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई राठोड आणि आप्पाराव राठोड हे लोहारा परिसरातील रहिवासी आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *