![]()
पती-पत्नीमधील किरकोळ वाद काही वेळातच टोकाला गेल्याने घरातच रक्तरंजित घटना घडली. दोघांनीही एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील लोहारा परिसरात घडली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. आप्पाराव राठोड आणि कमलाबाई राठोड अशी या दाम्पत्याची नावे आहेत. जखमी आप्पाराव यांच्यावर लोहारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई राठोड आणि आप्पाराव राठोड हे लोहारा परिसरातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये कोणत्यातरी किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला झालेला हा वाद काही वेळातच वाढला. दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी घरात असलेल्या धारदार शस्त्रांचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पती-पत्नीने एकमेकांवर वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. यामध्ये कमलाबाई यांच्या गळ्यावर गंभीर वार झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या हाणामारीत आप्पाराव राठोड हे देखील गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने लोहारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मुलासमोर घडला संपूर्ण प्रकार या घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हाणामारीच्या वेळी दाम्पत्याचा मुलगा घरात उपस्थित होता. हा मुलगा गतिमंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घटनेच्या वेळी नेमके काय घडले, वाद कशामुळे सुरू झाला आणि पहिला वार कोणी केला, याबाबत पोलिसांना त्याच्याकडून स्पष्ट माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. घटनास्थळी पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबत फॉरेन्सिक पथकही दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पथकाने आवश्यक पुरावे गोळा केले. हाणामारीसाठी वापरण्यात आलेली धारदार शस्त्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, वादाची सुरुवात कशी झाली आणि दोघांनी एकमेकांवर नेमके कशा पद्धतीने वार केले, याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना केवळ कौटुंबिक वादातून घडली की त्यामागे आधीपासूनचा कोणता वाद होता, याचाही तपास केला जात आहे. त्यामुळे घटनास्थळी मिळालेले पुरावे, शस्त्रे आणि इतर परिस्थितीजन्य बाबींच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. तसेच परिसरातील नागरिक आणि संबंधित व्यक्तींकडूनही माहिती घेतली जात आहे. नेमका वाद कशामुळे झाला? पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, तपासानंतरच हत्येचे नेमके कारण आणि घटनेचा क्रम स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे लोहारा परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट:पतीनंतर सहकारी महिला डॉक्टरही अटकेत, कथित अनैतिक संबंधांचा तपास आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला तब्बल सहा महिन्यांनंतर वेग आला आहे. या प्रकरणात आधी त्यांचे पती डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अनैतिक संबंधांचा कथित अँगल पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, डॉ. मनीषा यांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण होते, त्यांचा मृत्यू आत्महत्या होती की घातपात, याचा अंतिम खुलासा पोलिस तपासानंतरच होणार आहे. सविस्तर वाचा…
Source link
धाराशिवमध्ये मुलासमोर पती-पत्नीमध्ये रक्तरंजित हाणामारी:एकमेकांवर धारदार शस्त्राने वार, पत्नीचा जागीच मृत्यू