![]()
बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला रस्त्यात अडवून काही समाजकंटकांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संतापजनक प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे, अशी कडक शब्दांत टीका केली आहे. या घटनेचा निषेध करताना रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, बिहारमधील हा व्हिडिओ प्रचंड मन हेलावून टाकणारा आणि त्यासोबतच चीड आणणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीचा या तथाकथित ‘संस्कृती रक्षकांनी’ अक्षरशः विनयभंग केला आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्रातील एका घटनेविषयी सांगितले की, असाच एक प्रकार महाराष्ट्रातही मागे घडला होता. 8 वर्षांच्या चिमूरडी सिंहगडावर बरमुडा घालून पर्यटनासाठी याआली होती म्हणून तथाकथित संस्कृती रक्षकांनी तिच्या वडिलांसोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली होती. ही अंधभक्तांची जमात पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे, त्यांना कोण प्रोत्साहन देत आहे? यांना कायद्याची भीती राहिली नाही का? शासनाने यांच्यावर जरा कारवाईचा बडगा उगारावा नाहीतर हे अंधभक्त उद्या झोंबी बनतील आणि सरकारमधील लोकांनाच आपले लक्ष करतील, अशी भीती देखील खडसे यांनी व्यक्त केली आहे. महिला आयोगाची गंभीर दखल बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीची आणि तिच्या साथीदाराची छेड काढणे, त्यांना मारहाण करणे तसेच मुलीचा विनयभंग करण्याच्या धक्कादायक प्रकाराची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (सुओ मोटो) गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बिहारच्या पोलीस महासंचालकांना थेट पत्र लिहून तातडीने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, व्हायरल झालेल्या व्हिडिओ फुटेजच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि या प्रकरणाची निश्चित कालमर्यादेत निष्पक्षपणे चौकशी करावी, असे कडक निर्देशही महिला आयोगाने दिले आहेत. तिघांना अटक जमुईच्या या संतापजनक घटनेला स्थानिक पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. जमुईचे पोलिस अधीक्षक विश्वजीत दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या जबाबानुसार ही घटना 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये साधारण 6 ते 7 लोक दिसत असून, त्यापैकी काहींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एफआयआर दाखल केला असून, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Source link
ही अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय:हे अंधभक्त उद्या झोंबी बनतील आणि…; बिहारमधील प्रकारावर रोहिणी खडसेंचा संताप