Headlines

कंजारा गावाच्या आदर्श ग्रामपंचायतीच्या प्रवासाला आजपासून सुरुवात:सीईओ विवेक गायकवाड, गावकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन




औढा तालुक्यातील कंजारा गावाच्या आदर्श ग्रामपंचायतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. गावाला आदर्श ग्रामपंचायत बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेऊन एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.” आदर्श गाव निर्माण करण्याची प्रक्रिया ही विविध घटकांवर आधारित असून त्यातील प्रत्येक घटकाकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम केले पाहिजे. एकही गुण गमावला जाऊ नये, यासाठी ग्रामपंचायत, गाव विकास समिती आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सोमवारी ता २१ केले. महाराष्ट्र फाउंडेशन, ग्रामपंचायत कंजारा, उगम ग्रामीण विकास संस्था आणि गाव विकास समिती, कंजारा यांच्या संयुक्त विद्यमाने कंजारा येथे विशेष गावसभा झाली. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे दोन्ही उपक्रम केवळ शासकीय अभियान न राहता ते गावाचे स्वतःचे अभियान असल्याची भावना प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी गावात विविध समित्या व गट गठीत करून त्यांच्यामार्फत नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी दयानंद कल्याणकर यांनी प्रास्ताविक करताना कंजारा गावाला आदर्श गाव करण्यासाठी ग्रामस्थ एकजूट झाले असून गाव विकास समितीची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आदर्श गाव दाटेगाव येथे भेट देऊन तेथील विकासकामांची माहिती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाच्या विकासाला गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले की, कंजारा गावात 23 महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटातील महिलांना विविध व्यवसाय व उद्योगांच्या माध्यमातून उद्योजक बनविण्यासाठी विविध फाउंडेशनच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत केशव गड्डाफोड यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सविस्तर माहिती दिली. सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, संतांचे विचार, लोकाभिमुख प्रशासन, तक्रार निवारण व्यवस्था, ग्रामपंचायत संकेतस्थळ, ग्रामसभा, कर व पाणीपट्टी वसुली, जलसंधारण, पाण्याचा ताळेबंद, शुद्ध पाणीपुरवठा, पाण्याचे पुनर्भरण, सौरऊर्जा, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गाव साठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची माहिती दिली. कुपोषणमुक्तीसाठी गावस्तरावर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, आणखी चार महिला बचत गट स्थापन करणे, 135 महिलांना लखपती बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी सेवा संकल्प अभियानाची माहिती देताना गावातील लोकसहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रामसभेच्या माध्यमातून दाखले वितरण, स्वच्छता, जलसंधारणाची कामे करण्याची नियोजन असल्याचे स्पष्ट केले. यावेळी गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे यांच्यासह अधिकारी व गावकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *