![]()
पुणे सायबर पोलिसांनी 1 कोटी 95 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. आरोपींनी व्हॉट्सॲप कॉलद्वारे कंपनीचा मालक असल्याचे भासवून अकाउंटंट मॅनेजरला विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला लावले होते. पोलिसांनी या प्रकरणातील 50 लाख 26 हजार 171 रुपये परत मिळवून देण्यासाठी कारवाई केली आहे. सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार एका कंपनीत अकाउंटंट मॅनेजर म्हणून काम करतात. आरोपींनी व्हॉट्सॲपवर त्यांच्याशी संपर्क साधला आणि स्वतःला कंपनीचे मालक असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास जिंकल्यावर, कंपनीच्या कामासाठी तातडीने पैसे पाठवायचे आहेत असे सांगून दोन बँक खात्यांमध्ये एकूण 1.95 कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले. तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी ज्या बँक खात्यांमध्ये पैसे वळवले होते, त्या सर्व बँकांशी ईमेलद्वारे संपर्क साधला. संबंधित खात्यांमधील रक्कम गोठवण्यात आली. तपासात, फसवणुकीतील 15 लाख रुपये ॲक्सिस बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले. बँक खात्यांचा तपशील, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींपैकी रोहन रामेश्वर जाधव याच्याकडे 2 मोबाइल कनेक्शन असल्याचेही उघड झाले आहे. अन्य 1 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा तपास अजून सुरू आहे. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शासनाच्या एमआरएम पोर्टलच्या मदतीने तक्रारदाराला एकूण 50 लाख 26 हजार 171 रुपये परत मिळवून दिले. यामध्ये 47 लाख 69 हजार 171 रुपये आणि 2 लाख 57 हजार रुपयांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी लोकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्हॉट्सॲप कॉल किंवा वरिष्ठांच्या नावाने आलेल्या संदेशावर खात्री न करता पैसे पाठवू नयेत. फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
Source link
कंपनीचा मालक असल्याचे भासवून 1.95 कोटींची फसवणूक:पुणे सायबर पोलिसांनी पाच जणांना अटक केली; 50 लाख रुपये परत मिळवले