Headlines

कोयना धरण परिसरात मध्यरात्री भूकंपाचे 5 सौम्य धक्के!:तीव्रता 2 ते 2.5 रिश्टर स्केल दरम्यान; धरणाला कोणताही धोका नाही




महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसराला मध्यरात्री साडे बारा ते पहाटे चार या वेळेत सौम्य भूकंपाचे तब्बल पाच धक्के बसले. या भूकपांची तीव्रता 2 ते 2.5 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. तीव्रता कमी असल्याने हे धक्के जाणवले नाहीत. दरम्यान, कोयनानगरचे भूकंप मापन केंद्र बंद असल्याने कोयना धरणापासून भूकंपांच्या केंद्रबिंदूचे अंतर, जमिनीतील खोली आणि अक्षांश, रेखांश याची नोंद होऊ शकली नाही. कोयना धरणाचा परिसर भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत या परिसराला लहान-मोठे भूकंपाचे लाखो धक्के बसले आहेत. त्यातील बहुतांश धक्के जाणवलेले देखील नाहीत. 3 पेक्षा जास्त रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवतात. एका अर्थाने कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिकाच सुरू असते. मात्र, धरणाला आजपर्यंत कसलाही धोका निर्माण झालेला नाही. कोयना धरण परिसरात मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास पहिला सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.1 एवढी होती. त्यानंतर एका तासाने दीड वाजता 2.3 क्षमतेचा दुसरा धक्का बसला. त्यानंतर सव्वा तीनला 2.2, पंधरा मिनिटांनी 2.5 आणि पहाटे चार वाजता 2.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा पाचवा भूकंपाचा धक्का बसला. या सर्व भूकंपांचा केंद्रबिंदू साताऱ्यापासून 50 ते 52 किलोमीटर अंतरावर होता. मंगळवारी मध्यरात्री ते पहाटे पर्यंत झालेले पाचही भूकंपाचे धक्के सौम्य होते. त्यामुळे नागरीकांना ते जाणवले नाहीत. दरम्यान, भूकपाच्या धक्क्यांमुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोयना धरण परिसरात अथवा पाटण तालुक्यात कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही. ऐन गणेशोत्सवात भूकंपाचे पाच सौम्य धक्के बसल्याचे समजताच नागरीक भयभीत झाले. कोयनानगर, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही केंद्रांवर भूकंपाची नोंद होते, त्याचवेळी भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर, त्याची खोली आणि अक्षांश, रेखांशाची अचूक माहिती मिळते. सध्या कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्र बंद असल्याने सविस्तर नोंदी मिळू शकल्या नाहीत, अशी माहिती कोयनेच्या भूकंप मापन केंद्रातील अधिकारी किरण कानुगडे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *