Headlines

एमआयटी एडीटीच्या इंग्रजी शिक्षण मॉडेलची केंब्रिजने दखल घेतली:चार वर्षांत 10 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षित; 378 जणांना C1-C2 स्तराचे प्रावीण्य




एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाच्या इंग्रजी शिक्षण मॉडेलची केंब्रिज विद्यापीठ, यूकेने दखल घेतली आहे. गेल्या चार वर्षांत 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण देऊन केंब्रिज लिंग्वास्किल प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल केंब्रिजने विद्यापीठाच्या कामावर एक अभ्यास प्रकाशित केला आहे. या अभ्यासाचे प्रकाशन आणि लिंग्वास्किल प्रमाणपत्र वाटप समारंभ मंगळवारी विद्यापीठाच्या प्रयाग सभागृहात झाला. या कार्यक्रमासाठी केंब्रिज विद्यापीठाचे उत्पादन व्यवस्थापक इयान कॉवली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोव्होस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, केंब्रिज विद्यापीठाच्या दक्षिण आशिया विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता मेहता, केंब्रिज परीक्षा केंद्राचे व्यवस्थापक डॉ. अतुल पाटील आणि विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण हेही व्यासपीठावर उपस्थित होते. एमआयटी एडीटी विद्यापीठाने आपल्या अधिकृत केंब्रिज केंद्राद्वारे पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण आणि मूल्यांकन बंधनकारक केले आहे. ‘केंब्रिज इंग्लिश मूल्यमापनाद्वारे रोजगारक्षम संवादकौशल्यांची बळकटी’ या शीर्षकाखाली केंब्रिजने विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्याचा आणि नोकरी मिळवण्याच्या क्षमतेचा विकास करण्यासाठी विद्यापीठाने राबवलेल्या इंग्रजी भाषा उपक्रमाचा अभ्यास आणि मूल्यांकन केले. एमआयटी एडीटीच्या केंब्रिज केंद्रातून गेल्या चार शैक्षणिक वर्षांत 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण घेतले आणि प्रमाणपत्र मिळवले. मागील शैक्षणिक वर्षात लिंग्वास्किल परीक्षेला बसलेल्या 3,461 विद्यार्थ्यांपैकी 378 विद्यार्थ्यांनी C1 आणि C2 ही उच्च प्रावीण्याची पातळी गाठली. या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादकौशल्याचे निकष पूर्ण केल्याचे विद्यापीठाने सांगितले. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांमध्ये जागतिक नोकरीच्या संधींसाठी आवश्यक संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि भाषिक क्षमता वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे केंब्रिजच्या अभ्यासात म्हटले आहे. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020) मधील कौशल्य-आधारित आणि नोकरी-केंद्रित शिक्षणाच्या उद्दिष्टांशी हा उपक्रम जुळतो. केंब्रिज विद्यापीठाचे व्यवस्थापक इयान कॉवली यांनी विद्यार्थ्यांना ‘इंग्रजी भाषेशी मैत्री करा’ असे आवाहन केले. ते म्हणाले, कोणत्याही भाषेला केवळ नोकरी मिळवण्याचे साधन समजू नका. भाषेसोबत मैत्री केल्यास ती तुम्हाला प्रावीण्य मिळवून देईल. इंग्रजीमुळेच मी जगभर फिरू शकलो. केंब्रिज आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादकौशल्य वाढवून आपली स्वप्ने पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *