Headlines

दगडूशेठ गणपतीच्या निर्माल्यापासून उत्सवात 2 टन खत:शेतकरी व सामान्यांना मोफत वाटप; रोटरी क्लब ऑफ युवा पुणेचा उपक्रम




पुण्यातील ‘दगडूशेठ’ गणपतीच्या चरणी भक्तीभावाने अर्पण केलेले फुले, हार, नारळ आणि दुर्वा या निर्माल्यापासून संपूर्ण उत्सवात 2 टन खत तयार केले जाते. रोटरी क्लब ऑफ युवा पुणेच्या सहकार्याने हा उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे. या खताचे वाटप शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोफत केले जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा 134 वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. उत्सवात जमा होणारे निर्माल्य डीपी रस्त्यावरील नवसह्याद्री क्रीडा संकुलाजवळ उभारलेल्या ‘निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पात’ नेण्यात येते. तिथे निर्माल्याची पावडर करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते. गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. या निर्माल्याचे खत करून त्याला नवा अर्थ देण्याचे काम दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ युवा पुणे करत आहे. हा प्रकल्प ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह क्लबच्या अध्यक्ष शलाका पाटसकर, सेक्रेटरी श्वेता उंडे आणि प्रकल्प समन्वयक मनोज धारप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रकल्प समन्वयक मनोज धारप यांनी सांगितले की, दररोज सुमारे 400 किलो निर्माल्यापासून साधारण 150 किलो खत तयार होते. यंदा या प्रकल्पाचे दहावे वर्ष आहे आणि मागील नऊ वर्षांपासून दगडूशेठ ट्रस्ट या प्रकल्पाशी जोडला गेला आहे. गणेशोत्सवात जमा होणारे निर्माल्य घेऊन आम्ही येतो आणि त्यापासून खत तयार करतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे यामध्ये मोठे सहकार्य मिळते. उत्सवात दररोज क्लबचा टेम्पो ट्रस्टकडे पोहोचतो आणि त्यांना दररोज साधारण 12 ते 15 पोती, म्हणजे सुमारे 400 किलो निर्माल्य मिळते. यापासून सुमारे 300 ते 400 किलो खत तयार होते आणि ते गरजू शेतकरी व सोसायट्यांना दिले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *