![]()
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेत धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. अहमदाबादहून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसमधून वाहतूक केला जात असलेला तब्बल 5,385 किलो मावा (खवा) अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केला. या साठ्याची अंदाजे किंमत 16 लाख 52 हजार 100 रुपये आहे. भेसळीचा संशय असल्याने माव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून संपूर्ण साठा सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. मिठाई तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मावा इतर राज्यांतून महाराष्ट्रात आणला जात असल्याने प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गुप्त माहितीच्या आधारे बस अडवली अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या अशोक लेलँड वेलकम लक्झरी बस क्रमांक MP-44-ZF-7214 मधून मोठ्या प्रमाणात माव्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या पथकाने धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने मोराणे हद्दीतील साक्री रोडवर हॉटेल बालाजी परिसरात ही बस थांबवली. बसची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात मावा आढळून आला. त्यानंतर हा संपूर्ण साठा पुढील तपासणीसाठी टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे नेण्यात आला. 13 प्रकारच्या उत्पादनांचे नमुने घेतले कोल्ड स्टोरेजमध्ये साठ्याची तपासणी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विविध उत्पादनांचे नमुने घेतले. एकूण 13 प्रकारच्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये प्रीमियम हलवा, इंडियन स्वीट हलवा, स्वीट हलवा, ट्रॅडिशनल स्वीट, इंडियन स्वीट, कृष्णा हलवा तसेच विविध कंपन्यांच्या नावाने विक्री होणाऱ्या हलवा आणि डेझर्ट उत्पादनांचा समावेश आहे. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर संबंधित अन्नपदार्थांमध्ये भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन आढळते का, हे स्पष्ट होणार आहे. अहवालानंतर पुढील कारवाई जप्त केलेल्या माव्याच्या साठ्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरू आहे. प्रयोगशाळेतील नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त मावा, खवा आणि इतर अन्नपदार्थ बाजारात येऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून वाहन तपासणी तसेच अन्नपदार्थांच्या नमुन्यांची तपासणी सुरू ठेवण्यात येत आहे. हेही वाचा… ‘चर्चेत राहण्यासाठीच हा सगळा प्रकार’:राहुल बोंद्रे यांच्या काँग्रेसमध्येच थांबण्यावर श्वेता महालेंचा निशाणा चिखली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाला अखेरच्या क्षणी ब्रेक लागला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय जाहीर केला. या संपूर्ण घडामोडींवर चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी प्रतिक्रिया देताना बोंद्रे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सविस्तर वाचा..
Source link
धुळ्यात FDA ची मोठी कारवाई:अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसमधून 5,385 किलो मावा जप्त, किंमत तब्बल 16.52 लाख